लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर मृत पक्ष्यांची माहिती देण्याचे आवाहन महापालिकेने केल्यानंतर तीन दिवसांत तब्बल ५७८ मृत पक्ष्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे मांसाहारी पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांनी आपल्या दुकानाची जैवयंत्रणा सक्षम करावी, दररोज स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे, अशी सूचना महापालिकेने केली आहे. तसेच बर्ड फ्लूचा संभाव्य धोका टाळण्यासाठी काय करावे व काय करू नये, याबाबत मार्गदर्शक सूचनाही काढण्यात आल्या आहेत.
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने हेल्पलाईनवर मृत पक्ष्यांबाबत तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गेल्या २४ तासांत ३५६ मृत पक्ष्यांची नोंद झाली आहे. यामध्ये कावळा आणि कबूतरे यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पालिकेच्या पशुवैद्यकीय (आरोग्य विभागाने) सूचना काढून याबाबत अधिक माहिती दिली आहे. जिवंंत पक्ष्यांना हाताळताना मास्क व ग्लोव्हजचा वापर करावा, पक्षी विक्री केल्यानंतर खुराड्यांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करावे, अशी सूचना मांसविक्री करणाऱ्या दुकानदारांना केली आहे.
काय करावे?
* पक्ष्यांच्या स्राव व विष्ठेसोबत स्पर्श टाळावा.
* पक्षी, कोंबड्यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते, अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा.
* शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा.
* कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा. व्यक्तिगत स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा.
काय करू नये?
* कच्चे चिकन, अर्धवट शिजलेले चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.
* आजारी दिसणाऱ्या, सुस्त पडलेल्या पक्ष्यांशी संपर्क टाळा.
* पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका.
* एखादा पक्षी मरण पावला तर त्याला उघड्या हाताने स्पर्श करू नका.
* आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे वनविभाग अथवा पशुसंवर्धन विभागास कळविणे आवश्यक आहे.