सुदान आता विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे प्रगती करतोय, सुदानच्या राजदुतांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 06:37 AM2019-11-28T06:37:52+5:302019-11-28T06:38:22+5:30

भारत आणि सुदान या दोन्ही उभय देशांमधील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील असून, विकसनशील देश अशी ओळख असलेला सुदान आता सर्वच बाबींमध्ये विशेषत: पायाभूत सेवा-सुविधांबाबत स्वयंभू होत आहे

Sudan is now progressing from a developing country to a developed country, the ambassador of Sudan believes | सुदान आता विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे प्रगती करतोय, सुदानच्या राजदुतांचा विश्वास

सुदान आता विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे प्रगती करतोय, सुदानच्या राजदुतांचा विश्वास

Next

मुंबई : भारत आणि सुदान या दोन्ही उभय देशांमधील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील असून, विकसनशील देश अशी ओळख असलेला सुदान आता सर्वच बाबींमध्ये विशेषत: पायाभूत सेवा-सुविधांबाबत स्वयंभू होत आहे, असा विश्वास भारतातील सुदानचे राजदूत अहमद युसुफ मोहम्मद एल्सिद्दीग यांनी व्यक्त केला. भारतीय लोकशाहीबद्दल आदर व्यक्त करत, जगभरात नावलौकिक असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्थानही आमच्या हृदयात आहे, हेदेखील सांगण्यास अहमद युसुफ मोहम्मद एल्सिद्दीग विसरले नाहीत.

वरळी येथील ‘लोकमत’च्या कॉर्पोरेट कार्यालयाला अहमद युसुफ मोहम्मद एल्सिद्दीग यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी त्यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक बाबींसह विविध विषयांवर ‘लोकमत’च्या संपादकीय मंडळाशी संवाद साधला. यावेळी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांची प्रमुख उपस्थिती होती.

अहमद युसुफ मोहम्मद एल्सिद्दीग म्हणाले, सुदान आफ्रिका खंडातील व अरब जगतातील सर्वात मोठा देश आहे. सुदान आफ्रिकेच्या हृदयस्थानी आहे. युनाटेड किंगडमपासून आम्ही १९५६ साली स्वातंत्र्य प्राप्त केले. त्यानंतर, आमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत आहे. सुदान अनेक घटकांनी होरपळला असला, तरीदेखील आता येथील पायाभूत सेवा-सुविधा वृद्धिंगत करण्यावर भर देत आहोत. गेल्या ३ वर्षांपासून आमचे संघटन सर्वच स्तरावर भक्कम बनू पाहते आहे. सुदानमध्ये परकीय गुंतवणूक वाढावी, भारतासारख्या देशातून कापूस आयात व्हावा, कृषी क्षेत्रात आर्थिक भरारी घेता यावी, यासाठी प्रयत्नशील आहोत. अंतर्गत वाद, अंतर्गत युद्धे याचा फटका बसला असला, तरी यातून सुदान सावरत आहे.

सुदानमध्येही भारताप्रमाणेच प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य आहे. वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांची संख्या वाढत आहे. सुदानमध्ये लष्करी प्रभाव राहिलेला नाही. नागरिकांना अपेक्षित कार्यप्रणाली अस्तित्वात आहे. लोकांपर्यंत पायाभूत सेवा-सुविधा पोहोचाव्यात, म्हणून प्रयत्न केले जात आहेत. सौरऊर्जेचा वापर करत आहोत. अद्ययावत तंत्रज्ञान वापरत आहोत. सॉफ्टवेअर इंडस्ट्री रुजवत आहोत. सुदानमधील विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी दाखल होत असतील. मात्र, आता आम्ही आमच्या येथील विद्यापीठे स्वयंपूर्ण करण्यावर भर देत आहोत. रेल्वेसाठीच्या पायाभूत सेवा-सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. खासगी क्षेत्राची गुंतवणूक वाढावी, यासाठी प्रयत्नशील आहोत. खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देत आहोत. कारण खासगी क्षेत्राशिवाय सरकार काही करू शकत नाही. सुदानमधील गुंतवणूकदारांची संख्या वाढत असून, ही सकारात्मक बाब आहे.

दीर्घकालीन अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
भारतीय लोकशाहीचा आम्हाला आदर असून, जगभरात भारतीय लोकशाहीने नावलौकिक प्राप्त केला आहे. माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा सुदानच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू होता, तेव्हा आमच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांना पंडित जवाहरलाल नेहरू
यांनी मदत केली होती. स्वातंत्र्यादरम्यान सुदानचा ध्वज कोणता, कसा असेल? या एका प्रश्नावर नेहरूंनी आपल्या खिशातील रुमाल काढत त्यावर काहीशी नोंद करत; असा सुदानचा ध्वज असेल, अशी प्रतिक्रिया दिल्याचे अहमद युसुफ मोहम्मद एल्सिद्दीग यांनी सांगितले. विशेषत: तो रुमाल आमच्या येथील वस्तुसंग्रहालयात अद्याप जतन करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘भारतीय चित्रपट सुदानमध्ये लोकप्रिय’
सामाजिक सुरक्षा वाढावी, म्हणून कार्यरत आहोत. सुदानमध्ये दाखल पर्यटकांमध्ये युरोपीयन पर्यटकांची संख्या मोठी आहे. भारतीय पर्यटकही मोठ्या संख्येने सुदानमध्ये येतात. भारतीय चित्रपट सुदानच्या अरबी भाषेमध्ये डब केले जातात आणि ते तेथे आवडीने पाहिले जातात, असे भारतातील सुदानचे राजदूत अहमद युसुफ मोहम्मद एल्सिद्दीग यांनी सांगितले.

Web Title: Sudan is now progressing from a developing country to a developed country, the ambassador of Sudan believes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई