Join us

निवडणुकीनंतर सुडाचे राजकारण

By admin | Published: April 30, 2015 11:33 PM

निवडणुका संपताच शहरात सुडाचे राजकारण सुरू झाले आहे. सहकार्य न करणाऱ्यांना धडा शिकविला जात आहे.

नवी मुंबई : निवडणुका संपताच शहरात सुडाचे राजकारण सुरू झाले आहे. सहकार्य न करणाऱ्यांना धडा शिकविला जात आहे. तुर्भे-इंदिरानगरमध्ये शिवसेना शाखाप्रमुखास विभागात फिरू न देण्याची धमकी देण्यात आली आहे. नेरूळमध्ये रिक्षाची तोडफोड करण्यात आली आहे. महानगरपालिकेची निवडणूक संपल्यानंतर विजयी व पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांनी प्रभागांमध्ये होर्डिंग लावून नम्रपणे मतदारांचे आभार मानले आहेत. निवडणुकांवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या उमेदवारांनी होर्डिंग लावण्यासाठी पालिकेची परवानगी काढण्याचे आणि पैसे भरण्याचे सौजन्य मात्र दाखविलेले नाही. अनेक उमेदवारांनी चक्क सुडाचे राजकारण सुरू केले आहे. ज्यांनी निवडणुकीत सहकार्य केले नाही त्यांना धमकावण्यास सुरुवात झाली आहे. तुर्भे - इंदिरानगरमधील शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांना बुधवारी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने धमकी दिली. आतापर्यंत तुम्ही खूप राजकारण केले. आता तुमचे काही चालणार नाही. इंदिरानगर परिसरात तुम्ही कसे फिरता तेच पाहतो असा दम दिला. याविषयी तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या धमकीचा निषेध केला आहे. शहरात इतर ठिकाणीही प्रतिस्पर्धी उमेदवारांसोबत फिरणाऱ्यांना धमकावले जात आहे. प्रत्येकाला ते सक्रिय असलेल्या पक्षाचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. प्रचार केला म्हणून धमकावणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. शहरात इतर ठिकाणीही अशा घटना वाढू लागल्या आहेत. नेरूळमधील सारसोळे परिसरात निकालाच्या रात्री एका व्यक्तीच्या रिक्षाची तोडफोड करण्यात आली. निवडणुकीतील पराभवाचा राग मनात धरून हा प्रकार करण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी अनेक उमेदवारांनी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये स्वखर्चाने कामे केली आहेत. परंतु ज्या परिसरातून मतदान झाले नाही त्या नागरिकांना जाब विचारण्यास सुरवात झाली आहे. एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये काही दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लादी बसविली होती. परंतु पराभव होताच लादी काढून नेली आहे. सोशल मीडियावरून या सोसायटीमधील छायाचित्र व संदेश मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. सीवूड परिसरामध्येही काही उमेदवारांनी सोसायटीमधील मलनिस्सारण वाहिनी बदलण्यासाठी पाइप आणून ठेवले आहेत. परंतु प्रत्यक्षात काम केलेले नाही. आता हे काम होणार की नाही याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. (प्रतिनिधी)च्पालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप झाले आहे. उमेदवारांनी वाटप केलेले पैसे व मिळालेली मते यांचा हिशोब जुळविण्यास सुरुवात केली आहे. च्कोणत्या विभागात किती खर्च केला व किती मते मिळाली यावरून कोण आपले व कोण फुटले याचा अंदाज बांधला जात आहे. च्निवडणूक काळात पाळलेला संयम आता ढळू लागल्याचे स्पष्ट होत आहे.