बस मार्गात अचानक बदल ‘बेस्ट’ नव्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:08 AM2021-09-08T04:08:57+5:302021-09-08T04:08:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बससेवेत सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने मागील आठवड्यात ४५ बसमार्ग खंडित व २३ बसमार्ग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बससेवेत सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने मागील आठवड्यात ४५ बसमार्ग खंडित व २३ बसमार्ग बंद केले. मात्र, याचे तीव्र पडसाद आता प्रवाशांमधून उमटत आहेत, तसेच बेस्ट समिती सदस्यांनीदेखील नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे आता प्रवाशांकडून अभिप्राय घेतल्यानंतर यामध्ये कोणते बदल करावेत, याबाबत बेस्ट प्रशासन निर्णय घेणार आहे.
बेस्ट उपक्रमामार्फत ४८४ मार्गांवर बस सेवा चालविली जाते. यामध्ये १ सप्टेंबरपासून बदल करीत ४१९ वर आणण्यात आली. मात्र, याबाबत प्रवाशांना आगाऊ सूचना देण्यात आली नव्हती. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे, त्यामुळे लसीकरण पूर्ण झालेले प्रवासी अद्यापही बेस्ट बससेवेवर अवलंबून आहेत. या प्रवाशांना बससेवेतील बदलाचा फटका बसत आहे.
या अडचणींचा करावा लागतोय सामना.....
बससाठी तासन्तास बसथांब्यावर प्रतीक्षा करणे, बसमार्ग बदलल्याने दुसऱ्या मार्गावर बस पकडण्यासाठी जावे लागणे किंवा रिक्षा, टॅक्सीचा पर्याय निवडणे, तसेच मार्ग खंडित केल्याने दोन वेळा बस बदलून प्रवास करावा लागत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. प्रवाशांचे हाल निदर्शनास आणून बेस्ट समिती सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे.
प्रशासन घेणार आढावा..
बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत असतानाच बेस्ट उपक्रमाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत तक्रारी वाढत असल्याने गणेश विसर्जनापर्यंत प्रवाशांची वाढणारी गर्दी, त्यांना येणाऱ्या अडचणी आदींची माहिती प्रशासन घेणार आहे. त्यानंतर बेस्ट समितीच्या पुढील बैठकीत याबाबत पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे.