लग्न समारंभ, नाईट क्लब, खासगी कार्यालयांवर अचानक छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:11 AM2021-02-20T04:11:42+5:302021-02-20T04:11:42+5:30

विनामास्क तसेच ५० पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकाचवेळी आढळल्‍यास दंड, गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काेराेनाबाधित रुग्णांची संख्या ...

Sudden raids on weddings, nightclubs, private offices | लग्न समारंभ, नाईट क्लब, खासगी कार्यालयांवर अचानक छापा

लग्न समारंभ, नाईट क्लब, खासगी कार्यालयांवर अचानक छापा

Next

विनामास्क तसेच ५० पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकाचवेळी आढळल्‍यास दंड, गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काेराेनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार लग्‍न समारंभासाठीची मंगल कार्यालये, जिमखाना, नाईट क्लब, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, सर्वधर्मीय स्‍थळे, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, सर्व खासगी कार्यालये या ठिकाणी अचानक छापा टाकण्यात येईल. त्या ठिकाणी मास्‍कचा वापर होत नसेल आणि ५० पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकावेळी आढळल्‍यास त्या व्यक्तींकडून दंड वसूल करण्यात येईल. तसेच त्‍या-त्‍या आस्‍थापनांवर गुन्‍हे दाखल करण्‍याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

कोरोनाच्‍या नवीन विषाणूचा काही देशांमध्ये प्रसार वाढला आहे, तर मुंबईत कोविड प्रतिबंधात्‍मक लसीकरण सुरू असतानाच गेल्या काही दिवसांत बाधित रुग्‍णांची संख्‍या पुन्‍हा वाढू लागली आहे. याची गंभीर दखल घेऊन पालिका आयुक्‍त इक्बालसिंह चहल यांनी गुरुवारी सर्व अतिरिक्‍त आयुक्‍त, परिमंडळीय सहआयुक्‍त, उपआयुक्‍त, सर्व विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्‍त यांच्‍यासह व्हिडिओ कॉन्‍फरन्‍सद्वारे बैठक घेतली. त्‍यावेळी आयुक्तांनी परिस्थितीचा आढावा घेऊन काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

* दररोज छापासत्र

लग्‍नसोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी करण्याचे आदेश सर्व २४ सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागात दररोज किमान पाच जागांवर छापा टाकून नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई केली जाईल, तर लग्‍नाचे आयोजक, पालक व संबंधित व्‍यवस्‍थापनांवरही गुन्‍हे दाखल करण्यात येणार आहेत. असे छापासत्र नाईट क्लब, उपाहारगृहं, चित्रपटगृहं, सर्वधर्मीय स्‍थळं, आदी ठिकाणीही होणार आहेत.

* विनामास्क फिरणाऱ्यांची आता खैर नाही

- मास्कचा वापर न करणारे व सार्वजनिक जागी थुंकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी मुंबईत सध्‍या कार्यरत २,४०० मार्शल्सची संख्‍या वाढवून ४,८०० करण्यात येणार आहे.

- सध्‍या दररोज सरासरी १२ हजार ५०० नागरिकांवर कारवाई केली जाते. यापुढे किमान २५ हजार नागरिकांवर दंडात्‍मक कारवाई होईल.

- पश्चिम, मध्‍य आणि हार्बर उपनगरीय रेल्‍वे सेवांच्‍या गाड्यांमध्‍ये विनामास्‍क प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी प्रत्‍येकी शंभर असे एकूण ३०० मार्शल्‍स नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच पोलीसही आता मार्शल म्‍हणून नागरिकांकडून दंड वसूल करू शकतील.

- महापालिकेच्‍या मालकीच्‍या सर्व इमारती, कार्यालये, रुग्‍णालये, आदी‍ ठिकाणी आवश्‍यकतेनुसार पालिकेच्या शिक्षकांची नियुक्‍ती करून विनामास्‍क फिरणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍याचे अधिकार देण्‍यात येतील.

- सर्वधर्मीय प्रार्थनास्‍थळांच्‍या जागी पुरुषांप्रमाणेच महिला मार्शल नेमून नियमांचे पालन होत असल्याची खात्री केली जाणार आहे.

- विनामास्‍क फिरणे, ५० पेक्षा अधिक व्‍यक्तींनी एकाचवेळी एकत्र येणे अशा नियमांचे उल्‍लंघन केल्‍यास तेथेही कारवाई करण्‍यात येईल.

Web Title: Sudden raids on weddings, nightclubs, private offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.