दिवाळीच्या खरेदीवर फिरलं पाणी; मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अचानक पावसाची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 10:24 PM2023-11-09T22:24:07+5:302023-11-09T22:25:17+5:30

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात ऐनवेळी दाखल झालेल्या पावसामुळे मुंबईकरांची दैना उडाली होती.

Sudden rain in Mumbai, Thane, Navi Mumbai on Diwali | दिवाळीच्या खरेदीवर फिरलं पाणी; मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अचानक पावसाची हजेरी

दिवाळीच्या खरेदीवर फिरलं पाणी; मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अचानक पावसाची हजेरी

मुंबई – एकीकडे दिवाळीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे शहर आणि उपनगरात अचानक आलेल्या पावसानं मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. दिवाळीनिमित्त बाजारात नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. अशावेळी मुंबईत अवकाळी पावसाने हजेरी लावली. कांजूरमार्ग, मुलुंड आणि मालाड, गोरेगाव, कांदिवली या परिसरात गुरुवारी रात्री पावसाच्या सरी कोसळल्या.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात ऐनवेळी दाखल झालेल्या पावसामुळे मुंबईकरांची दैना उडाली होती. विशेषतः दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेले मुंबईकर आणि कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांचे पावसामुळे हाल झाल्याचे चित्र होते. तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये गारे वारे वाहत होते. दरम्यान, बिन मौसमी पावसामुळे वातावरणातील प्रदूषके खाली बसतील आणि मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक सुधारण्यास मदत होईल.

ठाणे, नवी मुंबईतही पाऊस

ठाणे जिल्ह्यात सगळीकडे पावसाने हजेरी लावली. नवी मुंबई परिसरात सोसाट्याच्या वा-यासह पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे फटाका विक्रेत्यांची व इतर व्यवसायीकांचीही धावपळ उडाली. रात्री ९ पासून विविध ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला होता.  साडेनऊला ऐरोली परिसरात पावसाने हजेरी लावली. विजाही चमकू लागल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. जोरात पाऊस येत असल्याने फटाके व दिवाळी साहित्य विक्रेत्यांनी दुकानाबाहेर ठेवलेले साहित्य हलविण्यासाठी लगबग करावी लागली.

Web Title: Sudden rain in Mumbai, Thane, Navi Mumbai on Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.