Join us  

अचानक घरात शिरला, चाकू घेऊन गॅस सुरु केला अन्... ; भायखळ्यात मुलांवर माथेफिरुचा जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 7:32 PM

भायखळ्यातील एका घरात अचानक शिकलेल्या माथेफिरूमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Mumbai Crime : मुंबई रोज नव्या गुन्हेगारीच्या घटना समोर येताना दिसत आहेत. अशातच भायखळा येथे एका घरात शिरुन माथेफिरूने बहीण भावावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आलीय. माथेफिरूने घरात घुसून केलेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या हल्ल्यानंतर माथेफिरूने घरातील साहित्याची तोडफोड देखील केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकणी माथेफिरुला पकडलं आणि अटक केली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी भायखळ्याच्या घोडपदेव परिसरातील एका इमारतीमध्ये माथेफिरुने गोंधळ घातला. इमारतीमध्ये तळमजल्यावर असणाऱ्या घरगुती क्लासेसमध्ये शिरलेल्या माथेफिरुने चाकूने दोन लहान मुलांवर जीवघेणा हल्ला केला. घोडपदेव येथील हेरंब अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास एक माथेफिरू तरूण संशयास्पदरित्या फिरत होता. लोकांनी त्याला तिथून हटकल्यानंतर अचानक तो घरगुती क्लासेस घेणाऱ्या महिलेच्या घरात शिरला. त्यानंतर महिलेची आरडाओरड पाहून माथेफिरु थेट स्वयंपाक गृहात शिरला आणि चाकू घेऊन बाहेर आला.

त्यानंतर माथेफिरुने दोन्ही मुलांवर चाकूने हल्ला केला आणि स्वतःलाही जखमी करुन घेतले. आरोपीने मुलाला धरुन ठेवलं आणि दार आतून लावून घेतलं. त्यानंतर घरात तोडफोड सुरू केली. त्याने गॅस सुरू करून  आग लावण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलीस हेरंब अपार्टमेंटमध्ये आले. पोलिसांनी खिडकीतून घरात प्रवेश करून मुलाची सुखरूप सुटका करून माथेफिरूला  ताब्यात घेतले. घरात तोडफोड करताना माथेफिरुच्या हाताला काचा लागल्या होत्या. त्यामुळे त्याला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचार केल्यानंतर रात्री आरोपीला अटक केली.

"पाच वाजता ट्यूशनची वेळ झाल्यामुळे दरवाजा खोलून मी दोन मुलांना आत घेतलं. बाकीची मुले येणार म्हणून दरवाजा उघडा ठेवला होता. दोन मुलांना घेऊन अभ्यासाला बसलेली असताना अचानक एक इसम आतमध्ये धावत आला. त्यामुळे घाबरुन दोन्ही मुलांना घेऊन मी बाहेर पडले. पळता पळता त्याने मला ढकललं आणि त्याने मुलांना आत खेचलं आणि त्यांच्यावर चाकूने हल्ला केला, असं घरगुती क्लासेस घेणाऱ्यांनी सांगितले.

कोण आहे हा माथेफिरु?

लेबांत पटेल (वय ३०) असे या माथेफिरुचे नाव असून तो तीन दिवसांपूर्वीच ओरिसातील चिंदगोडा येथून मुंबईत आला होता. गेल्या तीन दिवसांपासून तो सीएसएमटी परिसरातच राहत होता. शुक्रवारी सायंकाळी तो घोडपदेव परिसरात आला. त्याचा अवतार बघून तिथल्या तरुणांनी त्याला हटकले. त्यानंतर घाबरून पटेल हा घरांच्या कौलावर चढला आणि अंगावरचा शर्ट काढून विचित्र हावभाव करू लागला. त्यामुळे लोकांनी त्याला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग सुरु केला. पळत पळत पटेल हेरंब दर्शन या इमारतीत शिरला होता.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस