मुंबई : राज्याच्या राजकारणात वन फाईन मॉर्निंग अचानक ‘काहीतरी’ घडेल, असे भाकित भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले. काही वेगळी राजकीय समीकरणे समोर येतील, असे संकेतही त्यांनी दिले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
आजच्या घडीला विधानसभेची मध्यावधी निवडणूक कोणालाही नको आहे. त्यात केवळ पैसाच खर्च होतो असा नाही, आज कोरोनाचे संकट आहे. त्यात निवडणूक घेणे शक्य नाही. अशावेळी सध्याच्या सरकारला काहीतरी पर्याय नक्कीच उभा राहील. निवडणूक न होण्यासाठी सगळेच प्रयत्न करतील पण कोणतेच समीकरण जुळले नाही तर मग पर्याय नसेल, असेही ते म्हणाले. भाजप राज्यात यापुढील सर्व निवडणुका स्वबळावरच लढेल असे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यातील भेटीत राजकीय विषयही होते पणत्यातून निष्पन्न काहीही झाले नाही. या भेटीमुळे राज्यात काही बदल होतील असे वाटत नसल्याचे पाटील म्हणाले.