मुंबई-
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधानानं संपूर्ण जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. लता दीदींच्या जाण्यानं देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर लता दीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. लता दीदी गायक म्हणून तर श्रेष्ठ होत्याच पण त्यांनी त्यांच्या आयुष्यात दाखवलेली माणुसकी देखील अनेकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करुन गेली आहे. याच बाबतचा एक प्रसंग गायक सुदेश भोसले यांनी आज कथन केला आहे.
लता दीदींच्या ९२ व्या वाढदिवशी म्हणजेच २८ सप्टेंबर २०२१ रोजी सुदेश भोसले यांनी लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. त्यावेळी फोनवर झालेलं संभाषण सुदेश भोसले यांनी सांगितलं.
"मी लता दीदींना वाढ दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीवार्द घेण्यासाठी फोन केला. तेव्हा त्यांनी सर्वात आधी मला तुम्ही कसे आहात? काम कसं चाललंय तुमचं? असा प्रश्न विचारला होता. माझं एकदम छान सुरू आहे. तुमचा आशीर्वाद सोबत आहे असं मी त्यांना म्हटलं. कोरोना आहे ना म्हणून विचारलं तुमचं काम कसं चाललं आहे. काहीही मदत लागली तर नक्की कळवा", अशी विचारपूस लता मंगेशकर यांनी केल्याचं सुदेश भोसले यांनी सांगितलं.
सुदेश भोसले यांनी यावेळी लता दीदींसोबतच्या आठवणींनाही उजाळा दिला. परदेशात कॉन्सर्ट करताना आधीच समोर २५ ते ३० हजार प्रेक्षक असताना बाजूला लता दीदींसोबत उभं राहून गाता आलं यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असं सुदेश भोसले म्हणाले.
लता दीदींना एकदा परदेशातील कॉन्सर्टमधील सुदेश भोसले यांच्यासोबतचे फोटो सापडले होते आणि ते देण्यासाठी लता दीदींनी सुदेश भोसलेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासाठी लता दीदींच्या घरुन आलेल्या फोनकॉलचीही आठवण सुदेश भोसले यांनी यावेळी सांगितलं.
"लता दीदींच्या घरुन मला फोन आला आणि लता दीदींना कॉन्सर्टचे काही फोटो सापडले आहेत. ते तुम्हाला देण्याची त्यांची इच्छा आहे असं मला फोनवर सांगण्यात आलं. त्यानंतर मी लता दीदी आता बाजूला आहेत का मला बोलता येऊ शकेल का असं मी म्हटलं आणि लता दीदी माझ्याशी बोलल्या. मला तुम्हाला भेटण्याची आणि आशीर्वाद घेण्याची खूप इच्छा आहे. पण मला हिंमत होत नाही. खूप घाबरतो असं मी त्यांना म्हटलं होतं. त्यावर लता दीदी हसल्या आणि अहो कशाला घाबरता. तुम्ही नक्की घरी या आपण गप्पा मारू असं लतादीदी फोनवर म्हणाल्या होत्या", असं सुदेश भोसले यांनी सांगितलं.