सुधा भारद्वाज यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:05 AM2021-02-14T04:05:47+5:302021-02-14T04:05:47+5:30
एल्गार परिषद; मानहानीकारक विधाने मागे घेण्याची मागणी केली रद्द लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एका अर्जावर ‘एनआयए’ने उत्तर देताना ...
एल्गार परिषद; मानहानीकारक विधाने मागे घेण्याची मागणी केली रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एका अर्जावर ‘एनआयए’ने उत्तर देताना केलेली मानहानीकारक विधाने मागे घ्यावी, असा अर्ज एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी सुधा भारद्वाज यांनी विशेष एनआयए न्यायालयात केला होता. हा अर्ज शुक्रवारी विशेष न्यायालयाने फेटाळला.
सुधा भारद्वाज यांनी खटल्यातील साक्षीदारांच्या जबाबाची प्रत ‘एनआयए’कडून मागितली होती. त्यावर ‘एनआयए’ने आक्षेप घेताना न्यायालयात सादर केलेल्या उत्तरात म्हटले की, सुधा भारद्वाज साक्षीदारांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची माहिती मिळताच त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल. घटनात्मक अधिकारांच्या नावाखाली आरोपी साक्षीदारांचा जीव धोक्यात घालत आहे.
न्यायालयाच्या रेकॉर्डवरून ही विधाने हटविण्यात यावीत, अशी मागणी भारद्वाज यांनी अर्जाद्वारे केली. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही तसेच आरोपी असल्याने एनआयए आपली अशी बदनामी करू शकत नाही व आरोप करू शकत नाही, असे भारद्वाज यांनी अर्जात नमूद केले. एनआयए व त्यांच्या वकिलांना अशाप्रकारचे गैरवर्तन न करण्याचे निर्देश द्यावेत तसेच ही मानहानीकारक विधाने मागे घेण्याचे आदेश द्यावेत. शिवाय युक्तिवादाच्या नावाखाली सरकारी वकील अशाप्रकारची वादग्रस्त विधाने करू शकत नाहीत. त्यांच्या या वर्तनामुळे न्यायालयाची प्रतिमा धुळीला मिळेल, असेही त्यांनी अर्जात म्हटले होते. मात्र, विशेष न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला.
.......................