सुधा करमरकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 06:19 AM2018-02-06T06:19:09+5:302018-02-06T06:19:31+5:30
मराठी रंगभूमीवर ‘लिटल थिएटर’ची रुजवात करणा-या ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य निर्मात्या सुधा करमरकर(८५) यांचे सोमवारी सकाळी वांद्रे रेक्लमेशन येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
मुंबई : मराठी रंगभूमीवर ‘लिटल थिएटर’ची रुजवात करणा-या ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य निर्मात्या सुधा करमरकर(८५) यांचे सोमवारी सकाळी वांद्रे रेक्लमेशन येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा मिलिंद करमरकर आहे. बालनाट्य चळवळीच्या प्रणेत्या म्हणून सुधातार्इंचे रंगभूमीवरील योगदान न विसरता येण्याजोगे आहे. त्यांच्या निधनामुळे बालनाट्य चळवळ पोरकी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. सुधा करमरकर यांचा जन्म १९३४मध्ये मुंबईत झाला. राज्य शासनाचा ‘प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव’ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता.
>गाजलेली बालनाट्ये
‘लिटल थिएटर’च्या माध्यमातून ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’, ‘अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा’, ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’, ‘चिनी बदाम’, ‘गणपती बाप्पा मोरया’ ही सुधातार्इंनी सादर केलेली बालनाट्ये लोकप्रिय ठरली. व्यावसायिक रंगभूमीवरही त्यांनी भूमिका साकारल्या. ‘पुत्रकामेष्टी’, ‘बेईमान’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या.
>बाल रंगभूमीच्या विकासासाठी समर्पित भावनेने आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या सुधा करमरकर यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अमेरिकेत जाऊन त्यांनी बाल रंगभूमी संकल्पनेचा विशेष अभ्यास केला होता. या चळवळीच्या त्या खºया अर्थाने अध्वर्यू होत्या.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री