Join us

कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते; सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 5:17 PM

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते, असं म्हणत उपस्थितांना अवाक् केलं.

मुंबईः विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 12 दिवस उलटले तरी राज्यात कोणीही सरकार स्थापन केलेलं नाही. शिवसेना-भाजपाला जनतेनं सत्ता स्थापनेसाठी बहुमत दिलेलं असतानाही सत्तावाटपावरून त्यांचं घोडं अडलं आहे. शिवसेना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे, तर भाजपा शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास तयार नाही. विशेष म्हणजे फडणवीसांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली असून, त्या भेटीतही मुख्यमंत्रिपद शिवसेनेला न देण्यावर फडणवीस आणि शाह यांचं एकमत झाल्याचीही चर्चा आहे. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली, बैठक संपल्यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते, असं म्हणत उपस्थितांना अवाक् केलं.महाजनादेश महायुतीबरोबर आहे. आम्ही शिवसेनेची वाट पाहू. सरकार आमचंच बनणार आहे. देवेंद्र यांच्या नेतृत्वातच आमचं सरकार बनणार असल्याचं आम्ही स्पष्ट केलेलं आहे. शिवसेनेला प्रस्ताव दिला आहे, प्रस्ताव काय आहे हे जाहीरपणे सांगायचं नाही हे ठरलेलं आहे. सरकार आमचंच येणार असल्याचं आम्ही जाहीरपणे सांगू शकतो. सरकार जनतेच्या महाजनादेशाचा आशीर्वाद घेऊन बनणार आहे. देवेंद्र यांच्या नेतृत्वात सरकार बनणार असून, त्यात किंतु आणि परंतु असं काहीही नसणार आहे, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीला चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित होते.  

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करणार असल्याचं सांगितलं आहे. शिवसेनेने आम्हाला अद्याप प्रस्ताव दिलेला नाही, मात्र देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे, शिवसेनेसाठी दारे नेहमीच खुली आहेत, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणार आहोत, जनतेने भाजप-शिवसेनेला कौल दिला आहे, लवकरच सरकार स्थापन होईल, भाजपाच्या संसदीय समितीची परवानगी मिळाली आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. 

टॅग्स :सुधीर मुनगंटीवारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भाजपा