मुंबई - आगामी लोकसभेच्या मैदानात उतरवून आपल्याला दिल्लीला पाठविले जाईल काय, या भीतीने सध्या राज्यातील बरेचसे भाजप नेते धास्तावले आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर ‘पक्षाने आपले नाव चंद्रपूरसाठी सुचविले आहे; पण तिकीट कापले जावे यासाठी आपण आग्रही आहोत,’ असे विधान करून मन की बात सांगितली होती. मात्र, त्यांच्या मन की बातला दिल्लीतून प्रतिसाद मिळाला नसून त्यांना चंद्रपूरमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. इच्छा नसताही मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेसने त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट मिळालं असलं तरी जनता त्यांना दिल्लीला पाठवणार नाही, असे म्हटले. माझं तिकीट मीच कापणार असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. पण, पक्षाने त्यांचं तिकीट कापलं नाही, मात्र जनता त्यांची दिल्लीत जाणारी वाट अडवेल की काय, हे येणारा काळच सांगेल, असे म्हणत वडेट्टीवारांनी सुधीर मुनगंटीवारांना चिमटा काढला आहे. तसेच, मुनगंटीवारांची इच्छा नसतानाही त्यांच्या गळ्यात जबरदस्तीने ही वरमाला घातली.पण, चंद्रपूर हा जिल्हा काँग्रेसचा आहे, तिथे काँग्रेसचे तीन आमदार असून भाजपाचे २ आमदार आहेत. तर, विधानपरिषदेचेही २ आमदार काँग्रेसचे आहेत. त्यामुळे, येथील जनता काँग्रेसचाच उमेदवार निवडून देईल, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल. यासंदर्भाने काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा असून ज्या वरिष्ठांची नावे जाहीर होतील, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
आमदार बनून राज्यातच राहण्याची इच्छा?
- लोकसभेपेक्षा सहा महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक लढून जिंकावी आणि राज्यातच मंत्री व्हावे, अशी अनेकांची इच्छा आहे; पण भाजपश्रेष्ठींनी आदेशच दिला तर लोकसभा लढण्याशिवाय पर्याय नसेल याची पूर्ण कल्पना या नेत्यांना आहे. त्यात, आता सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची लोकसभेसाठी घोषणा झाली आहे.