अवनी वाघिणीला नाईलाजाने ठार करावं लागलं, मुनगंटीवारांचं मनेका गांधींना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 11:58 AM2018-11-05T11:58:33+5:302018-11-05T12:59:39+5:30
तेरा जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी (टी 1) वाघिणीला ठार मारण्यात आले. दीड महिन्यापासून वन विभागाचे पथक तिच्या मागावर होते.
मुंबई - तेरा जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी (टी 1) वाघिणीला ठार मारण्यात आले. दीड महिन्यापासून वन विभागाचे पथक तिच्या मागावर होते. या घटनेवरुन आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. अवनी वाघिणीला महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीररित्या ठार मारल्याचा गंभीर आरोप केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी केला असून कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला. यावर मनेका गांधी यांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
'वाघिणीला ठार करण्याचा निर्णय मंत्री किंवा सचिव घेत नाही. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शिकेनुसार निर्णय घेतला', असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. वाघिणीच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांचाही विचार करावा लागतो, अशा शब्दांत त्यांनी मनेका गांधी यांना टोला लगावला.
मुनगंटीवार पुढे असंही म्हणाले की, पाच जणांचे बळी गेले, तेव्हाच वाघिणीला पकडण्याचे आदेश दिले होते. मात्र काही प्राणिमित्रांनी हायकोर्टातून त्यास स्थगिती मिळवली.
नाईलाजाने ठार केले
‘अवनी’ वाघिणीला बेशुद्ध करून जिवंत पकडण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने वन कर्मचा-यांचा जीव वाचविण्यासाठी नाईलाजाने तिला ठार मारावे लागले. मंत्री आणि सचिव मुंबईत मंत्रालयात बसून वनांचे आणि वन्यजीवांचे रक्षण करत नाहीत. ते शेतकरी व अदिवासी करतात. त्यांच्यामध्ये खूप असंतोष होता. तो दूर केला नसता तर अखेरीस हेच लोक वन्यजीवांचे शत्रू झाले असते,असंही मुनगंटीवार यांनी सांगितले.
(महाराष्ट्र सरकारने केली ‘अवनी’ची बेकायदा हत्या, मनेका गांधींचा आरोप)
काय म्हणाल्या मनेका गांधी?
शार्प शूटर असगर अली याने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांच्या आदेशावरून अवनीच्या केलेल्या हत्येला मेनका गांधी यांनी पूर्णपणे बेकायदेशीर ठरवले. गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये वाघिणीच्या हत्येचे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रामुख्याने उपस्थित केले आहे. गांधी म्हणाल्या की, वाघिणीला बेशुद्ध करून न पकडता थेट गोळी मारण्यात आली. वाघिणीच्या हत्येचे प्रकरण मी कायदेशीर, गुन्हेगारी व राजकीय प्रश्न म्हणून उपस्थित करील. या वाघिणीला यवतमाळ जिल्ह्यात दोन नोव्हेंबर रोजी गोळी घालून मारण्यात आले. गेल्या दोन वर्षांत अवनी १३ जणांच्या मृत्युला कारण ठरली. दहा महिन्यांपासून दोन बछड्यांची ती काळजी घेत होती. तिला राळेगाव हद्दीतील बोराटी जंगलात शूटर असगर अली याने गोळी घालून मारले. बेकायदा हत्या घडवण्यास असगर अली याचा वापर केला गेला, असे मेनका गांधी यांनी म्हटले. ज्या क्रूररितीने तिला ठार मारण्यात आले त्यामुळे मी खूप दु:खी आहे. अनेक पक्षांनी विरोध करूनही मुनगंटीवार यांनी तिला मारण्याचा आदेश दिला, असेही त्या म्हणाल्या.