मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसे पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याची चर्चा सुरु असतानाच भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तसेच मनसे आणि भाजपा युतीबाबत दोन्ही पक्षाच्या नेते विविध प्रतिक्रिया देत आहेत. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे विचार भाजपाशी साम्य असेल तर भविष्यात मनसे आणि भाजपाची युती होण्यास काही अडचणी नसतील असं मत व्यक्त केलं आहे.
...तर मनसे भाजपासोबत येईल; संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं मोठं विधान
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांचे राज ठाकरे यांनी जेवढं कौतुक केलं होतं तेवढं अजून कोणीही केलं नाही. तसेच राज ठाकरे यांचे विचार भाजपाच्या विचारांशी साम्य असेल तर मनसे आणि भाजपाला भविष्यात सोबत येण्यास काही अडचणी नसतील असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगतिले. राज ठाकरे यांचा विचार जर समविचारी, विकासाचा आणि मोदींच्या नेतृत्वामध्ये देश प्रगतीवर जावा असा वाटणार असेल तर भाजपा आणि मनसेची युती शक्य असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
...अन् अखेर स्वत: देवेंद्र फडणवीसांनीच सांगितली मनसेबाबत 'राज की बात'
एकेकाळी राज ठाकरे यांनी गुजरातमध्ये जाऊन नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं. मात्र मी जेव्हा गुजरातला गेलो होतो तेव्हा माझ्यासमोर खोटं चित्र उभं केलं असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर केला होता. तसेच 2014 नंतर वर्षभरात दाखवलेलं चित्र वेगळं होतं हे कळल्यानंतर माही माझी भूमिका बदलली असं राज ठाकरेंनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, आगामी 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन असून या अधिवेशनात राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकत्व कायद्यावरुन राज्यात जे आंदोलन सुरु आहे, नवीन सरकारची कामगिरी या सर्व विषयावर राज ठाकरे बोलणार असल्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आतापर्यत नरेंद्र मोदींच्या धोरणावर खूप आगपाखड केली आहे. त्यामुळे मनसेने भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले असले तरी भाजपा मनसेला सोबत घेणार का हे आगामी काळातचं समोर येणार आहे.