मुंबई-
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन भाजपाचे नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. राज्याचं गृहखातं झोपा काढण्यात कुंभकरणालाही मागे टाकेल असा कारभार करत असल्याचा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे. देशात महिलांविरोधातील गुन्हेगारीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो याची आकडेवारीच मुनगंटीवार यांनी सभागृहात सादर केली.
"गुन्हेगारीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो हा मुद्दा देखील आपण सोडून देऊ. पण दोषसिद्ध करण्याचं प्रमाण बिहारमध्ये देखील ५० टक्क्यांहून अधिक आहे. पण महाराष्ट्रात हेच प्रमाण १५ टक्के इतकं आहे. यातून राज्याचं गृहखातं किती झोपा काढतं हे लक्षात येतं. तो कुंभकरण देखील या सरकारला म्हणेल महाराष्ट्राचं गृहखातं 'रिश्ते में तो मेरा भी बाप निकला'', असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.
"राज्यात दिवसेंदिवस गुन्हेवारी वाढत आहे. आपण शक्ती कायदा आणत आहात. पण अंमलबजावणीचं काय? लोकसंख्या जास्त आहे म्हणून गुंडांची संख्या जास्त आहे. गुन्हेगारी जास्त आहे हे असंही आपण समजून घेऊ शकतो. पण दोषसिद्ध करण्याच्या घटत्या प्रमाणाचं काय? हे अतिशय दुर्दैवी आहे. दोषिसिद्ध करण्याच्या वेगात बिहार देखील महाराष्ट्राच्या पुढे आहे याचा विचार गृहखातं करणार आहे का?", असं मुनगंटीवार म्हणाले.