Sudhir Mungantiwar News: ९ जुलैला वाघनखे साताऱ्याच्या सरकारी म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व तिथले सरदार यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. काही शंका उपस्थित केल्या. एक शंका होती की वाघनखे आणण्यासाठी भाडे दिले जाणार आहे का? एक नवीन पैशाचे भाडे दिले गेलेले नाही. कुणीही तसे मागितलेले नाही. वाघनखे आणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा दावा केला गेला. आपल्या एका दिवसाच्या अधिवेशनाच्या खर्चापेक्षाही कमी खर्च, म्हणजे जाणे-येणे आणि करार करणे यासाठी १४ लाख ८ हजार रुपये खर्च झाला. वाघनखे ठेवण्यासाठी ७ कोटींचा खर्च असल्याचा दावा केला गेला. पण हे असत्य आहे. या वाघनखासोबत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर सर्व शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवत आहोत. त्यासाठी केलेला हा एकत्रित खर्च आहे, अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची आणण्यात येणारी वाघनखे खरी आहेत का, याबाबत शंका उपस्थित केली होती. लंडनच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याबाबत दावे करण्यात आले. याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत एक निवेदन दिले. ही वाघनखे शिवरायांचीच असल्याचे आमच्याकडे आलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
तीन वर्षांसाठी वाघनखे आपल्याकडे राहतील असा निर्णय झाला
आम्ही माहिती घेतली की, यासंदर्भात जगात इतरत्र कुठे काही उपलब्ध आहे का? इतर ठिकाणच्या पुराव्यांमध्येही माहिती देण्यात आली आहे. ही वाघनखे लंडनला गेल्यानंतर ब्रिटनमध्ये प्रदर्शनातही ठेवण्यात आली होती. १८७५ व १८९६ साली ही प्रदर्शने भरवण्यात आली. त्यासंदर्भात तेव्हाच्या वर्तमानपत्रांतही बातम्या आल्या. त्यानुसार ही वाघनखे त्या संग्रहालयात असल्याचे सांगण्यात आले. आपला पत्रव्यवहार पाहिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा वर्षभरासाठी ही वाघनखे दर्शनासाठी देऊ असे सांगितले. पण आम्ही पुन्हा प्रयत्न केला. त्यानंतर तीन वर्षांसाठी वाघनखे आपल्याकडे राहतील असा निर्णय झाला, असेही ते म्हणाले.
दरम्यान, अनेक शिवभक्तांची मागणी होती की, अफजलखान कबरीजवळचे अतिक्रमण हटवावे. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी या दिवशी ते हटवण्याचा निर्णय झाला. १० नोव्हेंबर रोजी ते अतिक्रमण हटवले. त्यानंतर शिवभक्तांनी वाघनखांची माहिती दिली. आपण त्यासंदर्भातला पत्रव्यवहार सुरू केला. ती वाघनखे शिवभक्तांच्या दर्शनासाठी द्यावीत असा पत्रव्यवहार पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान आणि त्या संग्रहालयाच्या प्रमुखांशी केला. त्यांचे उत्तर आले. १८२५ रोजी बनवलेल्या डबीत ही वाघनखे ठेवली आहेत. त्या चित्रासह त्यांनी सर्व माहिती पाठवली, असे त्यांनी सांगितले.