Join us

छत्रपती शिवाजी महाराजांवर २० भाषेत टॉकिंग ऑडिओ अन् व्हिडीओ बुक तयार करणार- सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 9:22 PM

सहा दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांचं विशेष टपाल तिकीट काढण्याचा रेकॉर्ड केल्याचं समाधान असल्याचं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचे सामर्थ्य प्रचंड होते. आपण स्वत:ला भाग्यशाली समजतो की आपण सर्व छत्रपतींच्या महाराष्ट्राचे निवासी आहोत, असे गौरवोदगार महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज काढले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सांस्कृतिक विभागातर्फे विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अभूतपूर्व असेच आहे असे नमूद केले. त्यामुळे रयतेच्या राज्याचा रोज राज्याभिषेक केला तरीही कमीच आहे. तिकिटाच्या माध्यमातून छत्रपतींना शासनाने वंदन केले आहे. गडकोट किल्ल्यांचे जतन सरकार करणार आहे, असे ते म्हणाले. जगदंबा तलवार, वाघनखं परत आणण्यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत. त्यामुळे जगदंबा तलावार आणि वाघनखं नक्कीच परत येतील असा विश्वास आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

मुनगंटीवार म्हणाले की, भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगात पोहोचविण्यासाठी संकल्प दिवस आज आहे. रयतेला सुखी ठेवण्याचे खरे वैचारिक सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होते. डाक विभाग अस्तित्वात आल्यापासूनच्या आजपर्यंतच्या इतिहासात कधीच कोणतेही तिकिट इतक्या लवकर निघालेले नाही. एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांवरील तिकिट सहा दिवसात सांस्कृतिक कार्य विभाग व डाक विभागाने एकत्र येत काढुन दाखविले असे मुनगंटीवार यांनी गौरवाने नमूद केले.

तीनशे भाषेत विकिपीडीया-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चरित्रासाठी व माहितीसाठी विकिपीडीयाने संपर्क साधला आहे. आम्ही त्यांना आवश्यक ती माहिती देणार आहोत. त्याच्या माध्यमातून शिवचरित्र जगातील ३०० भाषांमध्ये प्रकाशित होईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

महाराजांवर टॉकिंग बुक-

श्रीमद् भगवद्गितेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांवर २० भाषेत टॉकिंग ऑडिओ आणि व्हिडीओ बुक तयार करण्याचा मानस मुनगंटीवार यांनी राजभवनातील कार्यक्रमादरम्यान व्यक्त केला.शिवाजी महाराजांवर नाणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेशी बोलणी झालेली आहे हे यावेळी सांगितले. लवकरच शिवाजी महाराजांवर आधारित पोर्टलही येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

राजभवनात चर्चेचा विषय-

भारतीय डाक विभागाच्या इतिहासात यापूर्वी १२ दिवसांत डाक तिकिट प्रकाशित झाल्याची नोंद होती. ही नोंदही तत्कालीन अर्थमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांच्या नावे आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांवरील डाक तिकिट अवघ्या सहा दिवसात प्रकाशित करून घेण्याचा विक्रमही आणि योगायोग सुधीर मुनगंटीवार यांच्या नावेच आहे. राजभवनात या विषयाची व मुनगंटीवार यांच्या कार्यशैलीची चांगलीच चर्चा झाली.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजरमेश बैससुधीर मुनगंटीवारएकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकार