सुजाताने अशी केली बाळाची हत्या़़़
By admin | Published: April 16, 2015 02:10 AM2015-04-16T02:10:20+5:302015-04-16T02:10:20+5:30
११ मार्च रोजी जेव्हा ही हत्या करण्यात आली, त्या वेळी तेथे बाळाची आई, दत्ता गायकवाड यांची आई, सुजाता यांची आई (मयत बाळाच्या दोन्ही आजी) होत्या.
अनिकेत घमंडी - डोंबिवली
११ मार्च रोजी जेव्हा ही हत्या करण्यात आली, त्या वेळी तेथे बाळाची आई, दत्ता गायकवाड यांची आई, सुजाता यांची आई (मयत बाळाच्या दोन्ही आजी) होत्या. बाळाला सकाळी तपासणीनंतर अंघोळीसह तयारही करण्यात आले होते. त्याच दिवशी बाळ-आईची तब्येत ठीक असल्याने डिस्चार्ज मिळणार असल्याचे डॉ. पुष्कर प्रधान यांनी सांगितले होते.
दरम्यान, सुजाताने आई-सासूला डॉक्टरांनी बोलवले असल्याचे सांगत त्यांच्याकडे पाठवले. त्यानंतर, तिने बाळाला पाळण्यातून बाहेर काढले. त्या वेळी तिच्याशेजारी असलेल्या भारती सिंग आणि नितू सिंग या पेशंटनी तिला बाळ झोपलेले असतानाही पाळण्यातून बाहेर काढण्याबाबतचे कारण विचारले. सुजाताने बाळाने शी केली असल्याचे सांगितले. त्यावरही त्या दोघींनी तसे काही दिसत नसल्याचे स्पष्टही केले. तरीही, तिने बाळाला बाहेर काढले. त्यानंतर, गॅलरीत फिरत असतानाच रुग्णालयातील जनरल वॉर्डमधील भारती चौधरी व अर्चना वरेकर यांनी तिला गच्चीकडे जाताना बघितले. ती परत आल्यावर तिचा चेहरा ओला होता आणि ती गप्प असल्याचेही सर्वांच्या निदर्शनास आले.
सुजाताला पहिली मुलगी असून दुसरा मुलगा व्हावा, अशी तिची अपेक्षा होती. तिचा पती काहीही कामधंदा करीत नाही, यामुळेही ती चिंताग्रस्त होती. त्यामुळेच ती बाळाला दूध पाजत नव्हती, जवळ घेत नव्हती. तसेच बाळाला पाळण्याने जोराजोराने झोका देत होती. घटनेच्या वेळी तिच्या जवळ कोणीही आले नसल्याचे साक्षीदारांनी सांगितले. त्यामुळे तिनेच बाळाला शेवटचे धरल्याचेही समोर आले.
लाय डिटेक्टरला दिला नकार
यंत्रणेने सुजतासह तिची सासू यांच्यावर संशय व्यक्त करत त्यांची ‘मानसशास्त्रीय चाचणी’ करण्याबाबत न्यायालयासमक्ष विचारपूस केली. त्यावर, सुजाताने स्पष्ट नकार दिला.
हत्या झाल्यापासून त्या नवजात अर्भकाचा मृत्यू कसा व कोणामुळे झाला, याबाबत कोणताही धागादोरा मिळत नसल्याने महिनाभर तपास यंत्रणा हैराण होती. संशयाची सुई सुजाता हिच्याकडे जात असतानाही ती मात्र हत्या केली नसल्याचे ठामपणे सांगत होती. त्यामुळे तपासयंत्रणेत बाधा येत होती. सुजाताचे सिझेरियन (प्रसूतीदरम्यान शस्त्रक्रिया) झाल्याने चौकशी करताना तपास यंत्रणेला अडथळे येत होते. सातत्याने तिच्यावरच संशय येत असला तरीही ठोस पुरावा मिळत नसल्याने समस्या गंभीर झाली होती.
सुजाताच्या भावाने तिला ७ मार्च रोजी या इस्पितळात प्रसूतीसाठी दाखल केले होते. ८ मार्च रोजी सिझेरियनचे आॅपरेशन होऊन तिने मुलीला जन्म दिला. गुरुवार, १२ मार्च रोजी घरी सोडण्यात येणार होते. त्यानुसार, सकाळी ७.३० वा. डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे सर्व तपासणी केली होती. त्यानंतर, सकाळी ८.३० च्या सुमारास या रुग्णालयाच्या डॉक्टर हर्षदा पुष्कर प्रधान यांना ते बाळ हॉस्पिटलच्या मागील बाजूच्या आवारात खाली पडल्याचे आढळून आले. त्यानुसार, त्यांनी त्यास तपासले असता त्या बाळाचा मृत्यू झाल्याचे त्यांना समजले. त्यांनी तातडीने रामनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधत घडला प्रकार सांगत तक्रार दिली होती.