मुलीला न्याय मिळावा म्हणून आईचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 05:53 AM2018-01-30T05:53:53+5:302018-01-30T05:54:10+5:30
शेजारी राहणारा तरुण मुलीला त्रास देत असल्याची तक्रार पोलिसात केली, पण पोलीस मुलीचे म्हणणे ऐकून घेत नसल्याने व मुलीला न्याय मिळत नसल्याने, पीडितेच्या आईने पोलीस ठाण्याबाहेरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी पार्क साइट पोलीस ठाण्याबाहेर घडली.
मुंबई : शेजारी राहणारा तरुण मुलीला त्रास देत असल्याची तक्रार पोलिसात केली, पण पोलीस मुलीचे म्हणणे ऐकून घेत नसल्याने व मुलीला न्याय मिळत नसल्याने, पीडितेच्या आईने पोलीस ठाण्याबाहेरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी पार्क साइट पोलीस ठाण्याबाहेर घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरा पोलिसांनी या प्रकरणी संतोष निगडेकर (३२) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पार्क साइट परिसरात ४२ वर्षांच्या शीला मौर्या कुटुंबीयांसोबत राहतात. गेल्या काही दिवसांपासून शेजारी राहणारा निगडेकर त्यांच्या २२ वर्षीय मुलीकडे वाईट नजरेने पाहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले, तसेच येता-जाताना तो तिला त्रास देत होता. रविवारीही त्याने तिच्यासोबत असभ्य वर्तन केले.
ही बाब मुलीकडून मौर्या यांना समजताच, त्यांनी मुलीसोबत रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पार्क साइट पोलीस ठाणे गाठले. मात्र, पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप मौर्या यांनी केला. पोलीस आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याने, मौर्या यांनी घरातून काही गोळ्या आणि कफ सीरपचे सेवन करत, पोलीस ठाण्याबाहेरच आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या मदतीने त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. अखेर रात्री उशिरा पोलिसांनी निगडेकरविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास
सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांची टाळाटाळ
या प्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप मौर्या यांनी केला आहे.