रुग्णाला श्वास घ्यायला होतो त्रास
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनानंतर पल्मनरी फायब्रोसिस हा आजार हाेताे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते हा आजार क्षय म्हणजे टीबी रुग्णांमध्ये आढळतो. त्यामुळे, एवढ्या कमी काळात फायब्रोसिसचा धोका होणे, हे धाेकादायक ठरू शकते. कोविडमध्ये न्यूमोनिया झाल्यानंतर पल्मनरी फायब्रोसिस होऊ शकतो.
हा फुप्फुसाचा आजार आहे. ज्यात तंतुमय फुप्फुसांना जखमा होऊन ते टणक हाेऊन त्यांच्यावर व्रण उमटतात. यामुळे त्यांची श्वासातील प्राणवायू आत घेण्याची आणि बाहेर सोडण्याची क्षमता कमी होते. परिणामी, शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो.
काेरोना झालेल्या अनेकांमध्ये पोस्ट कोविडमध्ये ‘लंग्ज फायब्रोसिस’चा आजार वाढत आहे. अनेकांना दीर्घ काळापर्यंत ऑक्सिजनपुरवठा करावा लागतो. फुफ्फुस खराब झाल्याचा परिणाम दिसून येतो. अस्थमासदृश लक्षणे दिसतात. अशा रुग्णांनी ‘इनहेलर्स’चा वापर कायम ठेवावा. कालांतराने हा आजार बरा होतो. ज्यांना अस्थमा आहे, अशा रुग्णांमध्ये काेराेनाचा धोका अधिक असतो, असे निरीक्षण छातीरोगतज्ज्ञ डॉ. अजित खोत यांनी नोंदवले.
शुद्ध हवा श्वासनलिकेतून वायुकोशांपर्यंत पोहोचते. फुप्फुसामध्ये काही दशलक्ष वायुकोश असतात. त्याभोवती केशवाहिन्यांचे जाळे असते. फुप्फुसाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ १४० स्क्वेअर मीटर असते. कोविड होऊन गेल्यानंतर फुप्फुसांमध्ये काही जास्त काळ न्यूमोनिया व त्याचबरोबर रक्त गोठल्याने झालेला थ्रम्बोसिस बरे व्हायला लागतात. फुप्फुसाचे प्राणवायू शोषणाचे कार्य मंदावत असल्याने योग्य काळजी घेणे गरजचे असल्याचे श्वसनविकारचिकित्सक डॉ. अमिता नुरी यांनी सांगितले.
१५ टक्के रुग्णांमध्ये तक्रारी
काेरोनामुक्त झालेल्या १०० पैकी १५ टक्के रुग्णांमध्ये पोस्ट कोविडची लक्षणे दिसून येत आहेत. त्यात १५ टक्के जणांना थकवा, तर ७ टक्के रुग्णांना फुप्फुसाचा फायब्रोसिस होताे. याशिवाय पायात गुठळ्या होतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डीसीज (सीओपीडी), दमा आणि लठ्ठपणा असणाऱ्यांना अधिक त्रास होऊ शकतो. हजारातील दोघांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येऊ शकतो. न्यूमोनिया झालेल्यांनाही दीर्घकालीन काळजी घ्यावी लागते, असे डाॅक्टरांनी सांगितले.
...अशी आहेत लक्षणे
फुप्फुसांचा फायब्रॉसिस झाला असेल, तर तुम्हाला धाप लागणे, कोरडा खोकला, थकवा, अचानक वजन कमी होणे, स्नायू आणि साध्यांमध्ये वेदना होणे, हातांची किंवा पायांची बोटे रुंद आणि गोलाकार होणे यासारखी लक्षणे दिसतात.
फुप्फुसांच्या फायब्रॉसिसचा प्रकार आणि गांभीर्य हे व्यक्तीनुसार बदलते. काही व्यक्ती या आजारामुळे पटकन आजारी पडतात, तर काही व्यक्तींमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसून येतात.
.....................................