धुराने जीव गुदमरला? तक्रार करा ॲपवर, एमपीसीबीचे ई-कॅटलिस्ट उपयोजन उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 06:28 AM2023-11-09T06:28:46+5:302023-11-09T06:32:01+5:30
मुंबईसह राज्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मंडळांकडून होणाऱ्या कारवायांत वाढ झाली आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यातील वाढत्या प्रदूषणाची तक्रार करता यावी म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) ई-कॅटलिस्ट ॲप उपलब्ध करून दिले आहे. या ॲपवरून नागरिकांना आपल्या शहरात किंवा परिसरात होणाऱ्या प्रदूषणाची तक्रार करता येणार आहे.
मुंबईसह राज्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मंडळांकडून होणाऱ्या कारवायांत वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून मंडळाने पर्यावरणाचे नियम पाळत नाहीत, अशा उद्योगांसह रेडी सिमेंट काँक्रीट प्लांटला रडारवर ठेवले आहे. याव्यतिरिक्त आता प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या लाँड्रीवरही कारवाई केली जात असून, सर्वच बांधकामांना मार्गदर्शक तत्त्वे पाळण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
तक्रार कशी नोंदवायची?
नागरिकांना प्रदूषणाची तक्रार नोंदविण्यासाठी मंडळाचे ई-कॅटलिस्ट ॲप डाऊनलोड करावे लागेल.
ॲप डाऊनलोड केल्यानंतर पहिल्या टप्प्यात तक्रार या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
दुसऱ्या टप्प्यात विचारलेल्या सर्व माहितीसह अर्ज पूर्ण
भरावा लागेल.
तिसऱ्या टप्प्यात तक्रार नोंदविण्यासाठी सबमिट बटणवर क्लिक करावे लागेल.
सोशल मीडियावर जनजागृती
प्रदूषणाचा वाढता प्रभाव पाहता मंडळ सोशल मीडियावरही सक्रिय झाले आहे. त्यानुसार, वायू प्रदूषणाची तीव्रता लक्षात घेता आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी निकषांचे पालन करूया, असे आवाहन मंडळाने सोशल मीडियावरून केले आहे.