- मनोज गडनीसमुंबई - गेल्या २६ जून रोजी नवी मुंबईतील वाशी येथून जप्त करण्यात आलेल्या ३१ किलो अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी सुफीया खान नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीत त्याची मोठी भूमिका होती. या तस्करीचा पर्दाफाश केल्यापासून एनसीबीचे अधिकारी त्याचा शोध घेत होते. तो कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमचा हस्तक असल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.
२६ जून रोजी वाशी येथे जप्त करण्यात आलेल्या ६० कोटी रुपयांच्या या अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी मुंबईतील नागपाडा, डोंगरी आणि वडाळा येथून तीन जणांना अटक करण्यात आले होते. त्यांच्या चौकशी दरम्यान सुफीया खान याचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्याचा शोध सुरू होता. मात्र, त्यानंतर तो सातत्याने त्याची जागा बदलत होता. अखेर बुधवारी त्याला वाशी येथील एक लॉजमधून अटक करण्यात आली.