सुगड, तिळगूळ खरेदीसाठी गर्दी, मकरसंक्रांतीची लगबग

By स्नेहा मोरे | Published: January 12, 2024 06:33 PM2024-01-12T18:33:23+5:302024-01-12T18:34:39+5:30

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकरसंक्रातींची लगबग शहर उपनगरातील बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे.

Sugad, the rush to buy Tilgul, the rush of Makar Sankranti | सुगड, तिळगूळ खरेदीसाठी गर्दी, मकरसंक्रांतीची लगबग

सुगड, तिळगूळ खरेदीसाठी गर्दी, मकरसंक्रांतीची लगबग

मुंबई: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकरसंक्रातींची लगबग शहर उपनगरातील बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. घराघरांत सुगडीपूजनासाठी लागणाऱ्या खरेदींची धामधूम सुरु असून त्यासह भोगीची तयारी, पूजेचे साहित्य आणि तिळगुळ खरेदीलाही उधाण आले आहे. फुलांच्या खरेदीपासून ते हलव्याच्या दागिन्यांना तरुणींपासून महिला वर्गाची पसंती मिळत आहे. मकर संक्रांत पारंपरिकरित्या साजरा केली जाते. संक्रांतीसाठी गूळ, तीळ, बाजरीचे तयार पीठ आदी वस्तूंनाही मोठी मागणी झाली आहे. सुवासिनी सुगडामध्ये हंगामातील भाज्या, धान्य घालून पूजन करतात.

भाजी मंडईतसह इतर ठिकाणी सुगड विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. सुगड खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी सुगड रंगवून विक्री केले जात होते. दादर , भायखळा, मालाड, लालबाग, मुलूंड या बाजारपेठांमध्ये महिला-तरुणींनी सुगड, गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, पाच फळे, तिळगूळ तसेच हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी लागणारे वाण, पूजेचे साहित्य आणि पूजेसाठी लागणार्या फुलांची खरेदी करत आहे. त्याशिवाय लहान मुलांसह तरुणांची पतंग खरेदीसाठी मशीद बंदर, क्राॅफर्ड मार्केट, दादर , लालबाग या ठिकाणी गर्दी दिसून येत आहे.

तिळाची वडी, तिळाचे लाडू, साखर, गुळाच्या वड्या, तिळाचा हलवा याच्या खरेदीसाठीही दुकानांमध्ये लगबग पाहायला मिळतेय. हलव्याच्या दागिन्यांसह लहान मुलांच्या बोरन्हाणसाठी लागणार्या विविध प्रकारच्या दागिन्यांसह रांगोळीची खरेदी करण्यात आली. विशेषतः कार्यालयीन वेळानंतर सायंकाळच्या दरम्यान बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह अन् चैतन्य पाहायला मिळाले. भोगीसाठीही लोकांनी साहित्यांची खरेदी केली. सुगड आणि पूजेच्या साहित्याच्या खरेदीला संमिश्र प्रतिसाद आहे. पाच सुगडांची किंमत ४० ते ६० रुपये आहे, तर पूजेच्या साहित्याची एकत्रित किंमत १०० ते १५० रुपये आहे, अशी माहिती विक्रेत्या मकरंद धोंडे यांनी दिली आहे.

तीळ महागले
यंदा अवेळी आलेल्या पावसाचा फटका तिळाच्या उत्पादनाला बसल्याने यंदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा बाजारपेठेत उत्पादन कमी झाल्यामुळे तीळाचे दर वाढले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ५० ते ७० रुपये प्रतिकिलो दर वाढल्याची माहिती विक्रेते रमाकांत दोषी यांनी दिली आहे.

भोगीच्या भाजीची तयारी
भोगीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी केल्या जाणार्या भाजीसाठी वाल पापडी, पापडी, मटार, वांगी, पावटा, गाजर आंदींच्या खरेदीकरिता शुक्रवारी बाजारात गर्दी झाली होती. भाज्यांना मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात दर वाढ झाली आहे. दरम्यान, तयार मिक्स भाज्यांच्या खरेदीकडे गृहिणींचा कल राहिल्याचे भाजीविक्रेते दामोदर घोरपडे यांनी सांगितले. भोगीसाठी लागणार्या भाज्यांच्या खरेदीसाठी भायखळा घाऊक बाजारात आठवड्याभरापासून सकाळपासून किरकोळ खरेदीदारांची गर्दी झाली होती.

Web Title: Sugad, the rush to buy Tilgul, the rush of Makar Sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.