हुमणी किडीने ऊस पोखरला; शेतकरी संकटात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 01:57 AM2018-08-24T01:57:41+5:302018-08-24T01:58:11+5:30
पश्चिम महाराष्ट्रात हजारो हेक्टरवर प्रादुर्भाव
- योगेश बिडवई
मुंबई : विदर्भात बोंडअळीने पुन्हा हल्लाबोल केला असताना पश्चिम महाराष्टÑात हुमणी किडीच्या हल्ल्यामुळे उसाचे पीक अडचणीत आले आहे. हुमणीने उसाची मुळे खाल्ल्याने हजारो हेक्टर क्षेत्रावरील पीक पिवळे पडू लागले असून ऊस उन्मळून पडत आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत हुमणी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला असून त्याचा सर्वाधिक फटका ऊसाला बसला आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी ही पिकेही त्याला बळी पडत आहेत. कीटकनाशकांच्या फवारणीचाही विशेष परिणाम होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हुमणी ही कीड जमिनीत असल्याने दिसत नाही. पिके पिवळी पडायला लागल्यावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येते. ही कीड मुळे खाते, त्यामुळे ऊसाची खोडे उन्मळून पडत आहेत. मे, जून महिन्यात हुमणीने अंडी घातल्यानंतर माझा दीड एकर क्षेत्रावरील ऊस उन्मळून पडायला सुरूवात झाल्याचे सातारा जिल्ह्यातील वडुजचे शेतकरी दत्ता पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ऊसापेक्षाही माझ्या ६ एकर क्षेत्रावरील आले पिकाचे एकरी एक लाख रुपयांचे नुकसान होण्याची भीती आहे, असेही पाटील म्हणाले.
माझ्या १६ एकरवरील ऊस उन्मळून पडत आहेत. कोंब जळून जात आहेत. केळीची पाच एकर बाग सुकायला लागला आहे. केळीचा कंद नाजूक असतो. किडीने कंद खाल्ला आहे, असे पुणे जिल्ह्यातील जाचक वस्तीवरील (इंदापूर) शेतकरी कपिल जाचक यांनी सांगितले.
काय आहे हुमणी?
हुमणीची एक मादी साधारणपणे ५० ते ६० अंडी घालते. हुमणीची कीड मुळांचा फडशा पाडते. गेल्या वर्षीही या किडीचा प्रादुर्भाव झाला होता. यंदा मात्र ऊसाचे ६० टक्क्यांहून अधिक नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
किडीबाबत व्यवस्थित माहिती नसल्यामुळे शेतकरी गोंधळला आहे. संपूर्ण राज्यात हुमणीचा प्रादुर्भाव दिसत आहे. या संकटाची कृषी खात्याला काहीच कल्पना नाही. डोळ््यादेखत पीक उद्ध्वस्त होत आहे. त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.
- अनिल पवार, प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना
ड्रीपमधून कीडनियंत्रण सोडल्याचा फायदा होत नाही. कारण ते बुंध्यापर्यंत पोहोचत नाही. शेतकºयांनी जैविक कीटकनाशकांचा कीड नियंत्रणासाठी आधी वापर करावा. त्याचा परिणाम न झाल्यास रायासनिक कीटकनाशकेच वापरावे लागतील.
- डॉ. अंकुश चोरमुले, कीटकशास्त्रज्ञ