आघाडी सरकार काळातही साखरेची आयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:20 AM2018-05-15T06:20:58+5:302018-05-15T06:20:58+5:30
केंद्र आणि राज्यात आघाडीचे सरकार असताना २०१२ मध्ये सर्वाधिक म्हणजे ९.९० अब्ज रु.किमतीची साखर पाकिस्तानातून करण्यात आली होती.
मुंबई : केंद्र आणि राज्यात आघाडीचे सरकार असताना २०१२ मध्ये सर्वाधिक म्हणजे ९.९० अब्ज रु.किमतीची साखर पाकिस्तानातून करण्यात आली होती. पाकिस्तानातून होणारी साखर आयात कमीकमी करीत सध्याच्या मोदी सरकारने ती २.०६ अब्ज रुपयांवर आणली, अशी माहिती समोर आली आहे.
सध्या सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी ती वस्तुस्थिती नाही. केंद्राने एक नियम केला आणि त्यानुसार, ठरावीक वस्तूची एखाद्या देशात निर्यात केल्यानंतर त्याबदल्यात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याची तरतूद आहे. त्याचा नेमका लाभ मुंबईतील एका कंपनीने घेतला आणि तोही पाकिस्तानसंदर्भात! यात कुठेही केंद्र वा राज्य सरकाचा संबंध नाही. या कंपनीने पाकिस्तानच्या कंपनीला चॉकलेट निर्यात केले आणि बदल्यात ३० हजार क्विंटल साखरेची आयात केली. त्यामुळे केंद्र वा राज्य सरकारने साखर आयात केली नसल्याचे राज्य शासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
पाकिस्तानी साखरेचे दर हे स्थानिक दरापेक्षा एक रुपयाने कमी आहेत. त्यामुळे कुण्या एका कंपनीने चॉकलेटची निर्यात केली होती आणि त्यातील साखरेच्या प्रमाणाइतकी साखर विनाशुल्क आयात केली आणि या नियमाचा फायदा लाटला. नुकतेच केंद्राने साखरेवर १०० टक्के आयात शुल्क लावले होते. त्यामुळे कुठल्याही प्रकारे साखरेची आयात होऊ नये, हे केंद्र सरकारने सुनिश्चित केले आहे आणि साखरेवर यापूर्वी इतके आयात शुल्क कधीच नव्हते, याकडे सदर अधिकाºयाने लक्ष वेधले.