Join us

महाराष्ट्रात बीटापासून साखर उत्पादन, पवारांच्या डोक्यातील 'गोडप्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 8:26 PM

पंजाबच्या अमृतसर येथील राणासिंग यांनी साखरेच्या बीटापासून साखर उत्पादनाचा प्रयोग अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी अमृतसर येथील बुट्टेर सेवियाँ गावातील राणा शुगर्सला भेट दिली. राणा शुगर्सचे राणा गुरुजीत सिंग यांनी आपल्या साखर कारखान्यात बीटापासून साखरेचे उत्पादन केले आहे. महाराष्ट्रातही बीटाच्या माध्यमातून साखरेचे उत्पादन घेण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे पवार यांनी यावेळी म्हटले. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसाठी हा प्रयोग महत्त्वाचा ठरेल, असेही पवार यांनी म्हटले. 

पंजाबच्या अमृतसर येथील राणासिंग यांनी साखरेच्या बीटापासून साखर उत्पादनाचा प्रयोग अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. शरद पवार यांनी आपले नातू आणि भारतीय साखर कारखाना संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासह राणासिंग यांच्या कारखान्याला भेट दिली. राणासिंग यांनी यशस्वीपणे केलेल्या संशोधनाबद्दल राणा सिंग, त्यांचे चिरंजीव आणि संपूर्ण टीमचे अभिनंदनही केले. तसेच महाराष्ट्रातही हा प्रयोग यशस्वी करुन दाखवायची इच्छा बोलून दाखवली. ''महाराष्ट्रातही मी गेल्या काही महिन्यांपासून बीटाच्या माध्यमातून साखरेचे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रयोगामुळे गळीत हंगाम दोन ते तीन महिने वाढवला जाऊ शकतो. या प्रयोगामुळे गळीत हंगाम दोन ते तीन महिने वाढवला जाऊ शकतो. तसेच ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना या प्रयोगामुळे मोठा दिलासा मिळू शकेल अशी मला आशा आहे'', असे पवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, शरद पवार यांनी वाघा बॉर्डर येथे रोहित पवार, माजीमंत्री दिलीप वळसे पाटील, व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांच्यासह पंजाब येथे शेती क्षेत्राचा अभ्यास दौरा केला. या अभ्यास दौऱ्यातून वेळ काढत पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वाघा बॉर्डरला भेट दिली. संरक्षणमंत्री असताना त्यांना आलेले अनुभव, राष्ट्रीय सुरक्षेचं महत्व अशा कित्येक बाबींसंदर्भातही पवार यांनी चर्चा केली.  

टॅग्स :शरद पवारसाखर कारखानेअमृतसर