मुंबई : हिंगोलीच्या पोलीस उपमहानिरीक्षक सुजाता पाटील यांना रिक्षाचालक आणि पोलिसांकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच, या प्रकरणी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे डी.एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अडचणीत येण्याची शक्यता आहे.सुजाता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळवरून ट्रेनिंग आटोपून पंजाब मेलने त्या मुंबईत आल्या. त्या वेळी मुलीची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली. तेव्हा दादरवरून थेट अंधेरी स्टेशन गाठले. पाय फ्रॅक्चर, त्यात हातात दोन बॅगा घेऊन तेथील रिक्षाचालकांना विनंती केली, पण त्यांनी डी. एन. नगरला येण्यास नकार दिला. आपण मुद्दामच ओळख लपविल्याचे त्यांनी सांगितले.रिक्षाचालक एकमेकांकडे पाहून उर्मटपणे माझ्याशी बोलत होते. हा प्रकार पाहून मी उपस्थित पोलिसांकडे मदत मागितली. त्या वेळी पोलिसांनी आम्ही येणार नाही, तू इकडे ये, असे सांगितले. मी तशाच अवस्थेत पोलिसांकडे गेले. तेव्हा विचारपूस करण्याऐवजी वाहतूक पोलीस हसत होते. त्यांना मी माझी व्यथा सांगितली. पण त्यांनी ‘मी तुमचा नोकर आहे का?’ असा उलट प्रश्न केल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. तर त्यांनी पोलिसाला नाव विचारताच, नेमप्लेट काढून खिशात ठेवली आणि तू माझे काय वाकडे करणार आहेस, असे बोलून हाकलून लावले, असे त्यांनी सांगितले. तेथून पुढे एका रिक्षावाल्याने खूप विनंती केल्यानंतर येण्यास होकार दिला. त्यादरम्यान १०० क्रमांकावरही फोन केला. मात्र तेथूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तेथून त्यांनी डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कॉल केले. मात्र मीटिंगमध्ये असल्याचे सांगत फोन कट केला. हा प्रकार थांबायला हवा, म्हणून सोशल मीडियावर वाचा फोडल्याची माहिती त्यांनी दिली.
रिक्षाचालक, पोलिसांकडून सुजाता पाटील यांना अपमानास्पद वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 6:16 AM