चेंबूर येथील घटना
चेंबूर येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुलगी आईकडे राहत असल्याच्या रागात वडिलांनीच तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना चेंबूरमध्ये घडली. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे कमलेश महुजी सोळंकी (३४) विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
चेंबूर येथील पी. एल लोखंडे मार्ग परिसरात सोळंकी कुटुंबीय राहण्यास आहेत. ममता कमलेश सोळंकी (३४) यांच्या तक्रारीवरून पोलीस अधिक तपास करीत आहेत. पती-पत्नीतील वादामुळे ममता या मुलीसोबत मुलुंड येथे राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास सोळंकीने त्यांची १२ वर्षीय मुलगी भक्ती आईसोबत मुलुंड येथे राहात असल्याच्या रागात वाद घातला आणि याच रागात मुलीवर चाकूने हल्ला चढवत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
आईने मदतीसाठी आरडाओरडा करताच स्थानिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. गर्दी जमत असल्याचे पाहून वडिलांनीही पळ काढला. स्थानिकांच्या मदतीने मुलीला जवळच्या सरकारी रुग्णालयात हलवले. मुलीची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू असल्याचे टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी दिली.