मुंबई : पत्नी सोडून गेल्याने कृष्णा तिमया नायडू (३६) या तरुणाने जोगेश्वरी स्थानकात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. मात्र आरपीएफ जवानांनी प्रसंगावधान राखत त्या तरुणाचे प्राण वाचवले. तो जोगेश्वरी पूर्वेकडील भागात राहत असल्याची प्राथमिक माहिती आरपीएफच्या वतीने देण्यात आली.शनिवारी संध्याकाळी ७.४३ वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी फलाट क्रमांक १वर चर्चगेट-बोरीवली लोकल दाखल होण्यापूर्वी कृष्णा रुळांच्या मधोमध झोपून राहिला. त्यानंतर लोकलचे एकूण ४ डबे त्याच्यावरून पुढे निघून गेले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मोटारमनने लोकल थांबवली. त्या वेळी आॅनड्युटी असणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबल जैनेंद्र यादव आणि हेड कॉन्स्टेबल सुजीत कुमार यांनी घटनास्थळी धाव घेत कृष्णाला सुखरूप बाहेर काढले. रुळांच्या मधोमध झोपल्याने कृष्णाला दुखापत झाली नाही. स्टेशन मास्तराच्या कार्यालयात कृष्णाची चौकशी केली असता, ‘पत्नी सोडून गेल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला,’ असे त्याने सांगितले. आरपीएफ जवानांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून कृष्णाला त्यांच्याकडे सोपविले. या गोंधळामुळे रेल्वे वाहतूक काही मिनिटे खोळंबली. (प्रतिनिधी)
पत्नी सोडून गेल्याने आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2016 4:32 AM