प्रेयसीवर हल्ला करत आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 05:07 AM2017-11-29T05:07:51+5:302017-11-29T05:08:03+5:30
अन्य तरुणासोबत प्रेमसंबध असल्याच्या संशयातून प्रियकराने लॉजमधील खोलीतच २० वर्षीय प्रेयसीच्या डोक्यात लाकडी फळीने हल्ला चढवित ब्लेडने वार केले.
मुंबई : अन्य तरुणासोबत प्रेमसंबध असल्याच्या संशयातून प्रियकराने लॉजमधील खोलीतच २० वर्षीय प्रेयसीच्या डोक्यात लाकडी फळीने हल्ला चढवित ब्लेडने वार केले. त्यानंतर स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना दादर परिसरात सोमवारी घडली. दोघांवरही केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्यात प्रेयसी गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृति चिंताजनक आहे. तर भोईवाडा पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अजमल शाहला (२१) बेड्या ठोकल्या आहेत.
अॅण्टॉपहील परिसरात २० वर्षाची नेहा (नावात बदल) कुटुंबियांसोबत राहते. ती महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्याच परिसरात राहणाºया अजमलसोबत तिचे चार वर्षांपासून प्रेमसंबध होते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजला जाते सांगून नेहा घराबाहेर पडली.
तेथून पुढे तिने सकाळी साडे अकराच्या सुमारास अजमल सोबत दादर पूर्वेकडील अप्सरा लॉज गाठले. तेथे खोली दाखवत असताना, अजमलने आतून दरवाजा बंद केला. आणि जवळील लोखंडी फळी नेहाच्या डोक्यात घातली. तसेच सोबत आणलेल्या ब्लेडने तिच्या मानेवर सपासप वार केले. नेहा खाली कोसळताच त्याने स्वत:च्या हातावरही ब्लेडने वार केले. नेहाच्या किंचाळीने लॉजचा मॅनेजर मोहम्मद इक्बाल कुन्ही यांनी खोलीकडे धाव घेतली. अन्य कर्मचाºयाच्या मदतीने दरवाजा उघडला.
तेव्हा दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांनी दोघांना केईएम रुग्णालयात दाखल केले. घटनेची वर्दी लागताच भोईवाडा पोलीस तेथे दाखल झाले.
त्यांनी विचारपुस करण्यात सुरुवात केली. नेहाची प्रकृति चिंताजनक असल्याने तिचा अद्याप जबाब नोंदविण्यात आलेला नाही. मंगळवारी अजमलचा जबाब नोंदविण्यात आला आहे. ’मै उससे प्यार करता हू.. मगर वो किसी औरसे प्यार करती है’ असे त्याने पोलिसांना सांगितले.
नेहाचे अन्य तरुणासोबत प्रेमसंबध असल्याच्या संशयातून त्याने तिला संपविण्याचा निर्णय केला. आणि याच रागात त्याने नेहावर हल्ला चढविल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय पाटील यांनी दिली. तरुणीच्या जबाबानंतर योग्य माहिती समोर येईल असे पाटील म्हणाले.