सतराव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 05:02 PM2024-04-13T17:02:17+5:302024-04-13T17:03:04+5:30
अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू करण्यात आला आहे.
गौरी टेंबकर, मुंबई: राहत्या घराच्या १७ या मजल्यावरून खाली उडी मारून एका तरुणाने आयुष्य संपवले. हा प्रकार चारकोप पोलिसांच्या हद्दीत घडल्यानंतर याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू करण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा प्रकार कांदिवली पश्चिमच्या भाब्रेकर नगरमधील परिश्रम बिल्डिंगमध्ये घडला. या ठिकाणी १७ व्या मजल्यावर राहणारा प्रवीण अचलखाम (२३) याने राहत्या घराच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना घडली. चारकोप पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या वेळी प्रवीणचे आई-वडील आणि भावंडे ही घरात उपस्थित होती. त्याने जेव्हा १७ व्या मजल्यावरून उडी मारली त्यापूर्वी प्रवीण हा त्याचा मित्र त्याला बोलावत असल्याचे ओरडत घराबाहेर पळाला. त्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्यानुसार पोलिसानी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत कुटुंबीय तसेच नातेवाईक आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले असून अधिक चौकशी सुरू आहे.