मुंबई : बऱ्याचदा क्षयरोग बरा होण्यास प्रदीर्घ कालावधी लागतो. या कालावधीत काही रुग्ण अर्ध्यावर उपचार सोडून येतात. यादरम्यान काही रुग्णांना नैराश्य, एकटेपणा येतो. या काळात रुग्णांना अशा स्थितीला सामोरे जाणे कठीण होते. शिवडी क्षयरोग रुग्णालयात गेल्या आठ वर्षांत २४ रुग्णांनी क्षयरोगामुळे आलेल्या नैराश्य आणि एकटेपणातून आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचे समोर आले आहे.
क्षयरोगावर उपचारांसाठी मुंबईतील शिवडी रुग्णालय हे प्रमुख रुग्णालय मानले जाते. शिवडी क्षयरोग रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २०१० ते २०१८ या कालावधीत २४ रुग्णांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी रुग्णांचे अधिकाधिक समुपदेशन होणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. याविषयी मानसोपचारतज्ज्ञ नूतन शहा म्हणाल्या की, क्षयरोगाच्या उपचारांसाठी मोठा कालावधी लागतो. अशा वेळेस या कालावधीमुळे रुग्णांना शारीरिक आणि मानसिक चढ-उतार सहन करावे लागतात. रुग्णांना अशा स्थितीत कुटुंब- नातेवाइकांचा पाठिंबा, योग्य उपचार, समुपदेशन लागते. आजारातून बाहेर पडण्यासाठी ज्याप्रमाणे औषधोपचार अत्यावश्यक असतात त्याचप्रमाणे मानसिक पाठबळही गरजेचे असते. मात्र ते कमी पडले की केवळ क्षयरोग रुग्ण नव्हेच तर कुणीही कोलमडते. त्यामुळे नैराश्याची लक्षणे वेळीच ओळखून त्या व्यक्तीला समुपदेशन करणे हा यावर उपाय असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नरेश पांडा यांनी सांगितले.
समुपदेशनामुळे घटले प्रमाणशिवडी क्षयरोग रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार आनंदे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांचा आढावा पाहता आता रुग्णांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी झाले आहे. २०१२-१३ साली प्रत्येक वर्षी पाच रुग्णांच्या आत्महत्यांची नोंद आहे. मात्र मागील दोन वर्षांत प्रत्येकी एकाच रुग्णाने आत्महत्या केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता समुपदेशनाच्या साहाय्याने हे प्रमाण कमी झाले आहे.