पैसे थकविल्याचा तणाव ; सुसाईड नोटवरून तपास सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एनएससीआयच्या (नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ऑफ इंडिया) बेसमेंटमध्ये रविवारी संध्याकाळी राजेश तावडे या बांधकाम कंत्राटदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. अनेकांनी त्यांचे पैसे थकवल्याच्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळावरून सापडलेल्या सुसाईड नोटवरून वर्तविण्यात येत आहे. यात पैसे थकविलेल्यांंची नावे लिहिली आहेत.
विक्रोळी परिसरात राहणारे तावडे हे सब कंत्राटदार म्हणून कार्यरत होते. एनएससीआयकडून सिव्हिल कामाचे कंत्राट त्यांना देण्यात येत होते. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एनएससीआयच्या बेसमेंटमधील पाण्याच्या पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळले. घटनेची वर्दी मिळताच ताडदेव पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत, शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात नेला.
घटनास्थळावरून मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये आठ ते दहा कंत्राटदारांची नावे आणि त्यांनी थकवलेली रक्कम, केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यात आला असून यात ५० लाखांहून अधिक रक्कम थकवल्याची माहिती समाेर आली आहे. थकलेल्या पैशांमुळे मजुरांचे पैसेही अडकले हाेते. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने ते तणावात होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुसाईड नोटच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.
............................