अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकमुळे आत्महत्या? ती फाईल रिओपन करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 01:57 PM2020-05-27T13:57:54+5:302020-05-27T13:58:12+5:30
नाईक कुटुंबीयांनी केलेल्या विनंतीवरून या प्रकरणाचा फेरतपासणी करण्यात येणार असून सीआयडीकडे हे प्रकरण सोपवण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली
मुंबई - रिपब्लिक टेलिव्हिजनचे प्रमुख व संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर काही दिवसांपूर्वी एक महिलेने आरोप केले होते. या संदर्भातील महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला होता. त्यानंतर, संबंधित महिलेने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही तक्रार केली आहे. आता, याप्रकरणी गृहमंत्र्यांनी पुनर्चौकशी करण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत. त्यामुळे, पत्रकार अर्णब गोस्वामी यांचे रिपब्लिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा सीआयडी मार्फत तपास होणार आहे. नाईक कुटुंबीयांनी केलेल्या विनंतीवरून या प्रकरणाचा फेरतपासणी करण्यात येणार असून सीआयडीकडे हे प्रकरण सोपवण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाचा तपास हा अलिबाग पोलिसांनी केला होता. या प्रकरणात अलिबाग पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. ५९/२०१८, भादंवि ३०६,३४ प्रमाणे तसेच गु.र.नं. ११४/२०१८ भांदवि कलम ३०२ प्रमाणे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या तक्रारीमध्ये अन्वय नाईक यांच्या मुलीने अर्णव गोस्वामी यांनी त्यांच्या वडिलांच्या कामाचे पैसे न दिल्याने त्यांचे वडील व आजीने आत्महत्या केल्याचे म्हटले होते.
आज्ञा नाईक यांनी मला तक्रारीत म्हटलं होतं की अर्णब गोस्वामींच्या @republic ने देणी थकवून त्यांच्या
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 26, 2020
वडिलांना व आजीला आत्महत्येस प्रवृत्त केलं ही बाब
अलिबाग पोलिसांनी नीट तपासली नाही. या केसमध्ये #CID कडून संपूर्णपणे नव्याने तपासाचे आदेश मी दिले आहेत.#MaharashtraGovtCares
याप्रकरणी, अलिबाग पोलिसांच्या तपासावर आपण समाधानी नसल्याने गुन्हेगारी प्रक्रिया संहीता (सि.आर.पी.सी) मधील कलम १७३ (८) मधील अधिकाराचा वापर करुन हे प्रकरण राज्य अन्वेषण विभाग अथवा गुन्हे शाखेकडे वर्ग करावे. तसेच तत्कालीन संबंधित तपास अधिकारी व इतर शासकीय अधिकारी / न्यायीक अधिकारी यांचे विरुध्द चौकशी करण्यात यावी, अशी विनंती अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. यासंदर्भात त्यांनी निवेदनही दिले होते. त्यानंतर, गृहमंत्री देशमुख यांनी हा तपास सीआयडीकडे वर्ग करत, ती फाईल रिओपन करण्याचे आदेश दिले आहेत. देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे.