सुंदर नसल्याने होणाऱ्या छळामुळे आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 12:54 AM2019-03-09T00:54:27+5:302019-03-09T00:54:32+5:30
कमी उंची, त्यात दिसायला सुंदर नाही असे हिणवत, सासरच्या मंडळीनी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच सुनेचा छळ सुरू केला आणि तिच्याकडे महागड्या वस्तूंची मागणी केली.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : कमी उंची, त्यात दिसायला सुंदर नाही असे हिणवत, सासरच्या मंडळीनी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच सुनेचा छळ सुरू केला आणि तिच्याकडे महागड्या वस्तूंची मागणी केली. याच त्रासाला कंटाळून विवाहितेने स्वत:ला जाळून घेतल्याची घटना पवईत घडली. या प्रकरणी पवई पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली.
सुरतमध्ये टुरिस्ट कारचालक म्हणून नोकरी करणारे सुनील मिश्रा (३६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ते मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. २०१६ मध्ये त्यांनी लहान बहीण संजू उर्फ रितूचे पवईतील रवींद्र तिवारीसोबत लग्न लावून दिले. मात्र, लग्नाच्या दुसºया दिवसापासून पतीसह सासरच्या मंडळीनी तिचा छळ सुरू केला. फक्त हुंड्यासाठी लग्न केल्याचे तिला सांगण्यात आले. कमी उंची त्यात दिसायला सुंदर नाही म्हणून तिला हिणवणे सुरू झाले. माहेरच्यांकडून महागड्या वस्तू आणण्यास सांगितले. लग्नाच्या दोन महिन्यांनी तिने माहेर गाठून घडलेला प्रकार सांगितला. अखेर, भावाने बहिणीच्या सुखासाठी नवीन फ्रिज, डिश टीव्ही, कूलर विकत घेत तिच्या सासरी पाठविले. त्यानंतर ३ महिन्यांनी ती सासरी गेली. वर्षभराने नातेवाइकाने रितूची भेट घेतली. तेव्हा उंची आणि दिसण्यावरून टोमणे सुरू असल्याचे समजले. तिच्याकडून आणखी हुंड्याची मागणी केली. पुढे सासरच्यांसोबत संवाद तोडण्यास भाग पाडले. त्यातच घराला वारस म्हणून मुलगा हवा असताना मुलगी झाल्याने छळात भर पडली. सासरच्यांनी १ लाख रुपयांची मागणी केली.
गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये वडील वारल्याने रितू गावी गेली. तेथे तिने छळ सुरूच असल्याचे सांगितले. भावाने तिला सासरी न पाठविण्याचे ठरवले. तेव्हा, सासरच्यांनी घटस्फोटाची धमकी दिल्याने, तिला परत पाठविण्यात आले. दरम्यान, ४ मार्चला तिने जाळून घेतले. ती राजावाडी रुग्णालयात दाखल असल्याचे समजताच भावाने रात्री साडेबाराच्या सुमारास रुग्णालय गाठले. मात्र, तासाभरापूर्वीच भावाच्या प्रतीक्षेत तिने प्राण सोडल्याचे त्यांना समजले.
या प्रकरणी सासरच्यांवर हुंडा, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पतीसह तिघांना अटक केल्याचे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.
>दोन महिन्यांत ८ जणींचा बळी
महिला दिनाचा जागर होत असतानाच, मुंबईसारख्या आर्थिक राजधानीतही हुंड्यासाठी या वर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांत चौघींची हत्या तर चौघींनी स्वत:हून आयुष्य संपविले.
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीवरून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.