सफाई कामगाराची गळफास लावून आत्महत्या, महापालिकेवर मृतदेहासह मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 05:42 AM2018-01-05T05:42:41+5:302018-01-05T05:43:01+5:30
तुटपुंज्या पगारात मुंबई स्वच्छ ठेवण्याचे काम करणा-या सफाई कामगारांना कोणतेही कारण न देता कामावरून काढून टाकण्यात येत आहे. अंधेरी विभागातील अशा सुमारे दोनशे कंत्राटी कामगारांना कोणतीही थकबाकी न देता पालिकेने घरचा रस्ता दाखविला आहे.
मुंबई - तुटपुंज्या पगारात मुंबई स्वच्छ ठेवण्याचे काम करणा-या सफाई कामगारांना कोणतेही कारण न देता कामावरून काढून टाकण्यात येत आहे. अंधेरी विभागातील अशा सुमारे दोनशे कंत्राटी कामगारांना कोणतीही थकबाकी न देता पालिकेने घरचा रस्ता दाखविला आहे. यामुळे निराश झालेल्या सुमती देवेंद्र (वय २९) या महिला सफाई कामगाराने गुरुवारी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने संतप्त झालेल्या सफाई कामगारांनी सुमती यांच्या मृतदेहासह पालिका मुख्यालयावर मोर्चा आणून प्रशासनाविरोधात निदर्शने केली.
ठेकेदारांमार्फत सफाईच्या कामासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार नियुक्त करण्यात येतात. मात्र बºयाच वेळा कामगारांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला दिला जात नाही. न्यायालयानेही त्यांच्या बाजूने कौल देऊन कामगारांना नियमित काम देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु पालिकेने ४००पैकी १९२ कामगारांना कामावरून काढले. सुमती देवेंद्र यापैकीच एक होत्या. नवºयापासून विभक्त झालेल्या सुमती यांना ११ वर्षांची मुलगी आहे. नोकरी गेली, सहा महिन्यांपासून पगार नाही, दीड लाख रुपये थकबाकी मिळाली नाही, अशा सर्व चिंतेने व्याकूळ होऊन त्यांनी विलेपार्ले येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतला. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच संतप्त कामगारांनी पालिकेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस मुख्यालयासमोर सुमती यांचा मृतदेह ठेवून आंदोलन केले. यामुळे या परिसरात तणाव पसरला होता. कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या पदाधिकाºयांनी आयुक्तांची भेट घेतली असता त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले.