मुंबई : वाकोला पोलिसांच्या हद्दीतील पोलीस वसाहतीत राहणारे निखिल शंकर मोरे या पोलीस कॉन्स्टेबलचा गळफास घेतलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मंगळवारी दुपारी सापडला आहे. या प्रकाराने खळबळ उडाली असून वाकोला पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत.
मोरे दाम्पत्य कोळे कल्याण येथील पोलीस वसाहतीत राहत होते. त्यांच्या पत्नी या देखील लोकल आर्म्समध्ये कार्यरत असून, हा प्रकार घडला तेव्हा त्या त्यांच्या पाच महिन्याच्या बाळाला घेऊन गावी गेल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, बरेच दिवस शेजाऱ्यांनी त्यांना पाहिले नव्हते. तसेच ते त्यांच्या पत्नीचाही फोनही उचलत नव्हते. मंगळवारी दुपारी मोरे यांच्या खोलीतून अचानक दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे स्थानिकांनी याबाबत पोलीस नियंत्रण कक्षावर फोन केला. तेव्हा वाकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने मोरे यांच्या घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी मोरे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. तो कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू होऊन बरेच तास उलटल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
त्यांनी आत्महत्या केली की यामागे काही वेगळे कारण आहे, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. त्यांनी आत्महत्या केली असल्यास मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहिली होती का, याचा शोध सुरू आहे. वाकोला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनयना नटे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी याबाबत अधिक माहिती देण्याचे टाळले.