तरुणीची हॉटेल लीला रेसिडन्सीमध्ये आत्महत्या
मृत मुलीच्या आईचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने घटना उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरीच्या हॉटेल लीला रेसिडन्सीमधील क्वारंटाइन सेंटरमध्ये तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार तीन महिन्यांपूर्वी घडला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.
संजली सिंग असे या मृत तरुणीचे नाव असून, ती गायिका होती. मृत मुलीच्या आईचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
ही तरुणी दुबईला कामानिमित्त तीन ते चार महिने जाऊन राहायची. संजली ३ मार्च २०२१ रोजी दुबईहून परत आल्याने तिला अंधेरीच्या हॉटेल साईलीला रेसिडेन्सी येथे क्वारंटाइन केले होते. मात्र, ६ मार्च २०२१ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास तिने हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तरुणीची आई ज्योती यांनी चौकशीदरम्यान मुलीचा प्रियकर अमनकुमार वर्मा व त्याची पत्नी संगीता वर्मा यांच्या विरोधात तक्रार दिली. जो मूळचा राजस्थानचा असून, मीरारोड परिसरात राहत होता. ज्योती यांच्या म्हणण्यानुसार, अमनकुमारने संजलीची फसवणूक केली, त्यामुळे तिने हे पाऊल उचलले. त्यानुसार ११ मार्च २०२१ रोजी एमआयडीसी पोलिसांनी अमनसह त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला. ‘आम्ही याप्रकरणी चौकशी करीत असून, अद्याप कोणताही पुरावा आम्हाला सापडलेला नाही. मात्र, यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल’ अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.
मढ बीचवरही मृतदेह सापडला
मुंबई : मालवणी पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या सिल्वर बीच याठिकाणी एका ३० ते ४० वयोगटातील महिलेचा मृतदेह सापडला. तिच्या डोक्यावरचे केस गेले असून, फक्त कवटी दिसत आहे. हाताची व पायाची बोटे गळून गेली असून, तिच्या अंगावर काळ्या रंगाचे टी-शर्ट व काळ्या रंगाचा चेक्सचा स्कर्ट आहे. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी भगवती रुग्णालयात पाठविण्यात आला असून, या महिलेसोबत काही गैरप्रकार झाल्याचा संशय मालवणी पोलिसांना आहे.