मुंबई - नरिमन पॉइंट येथील मेकर चेंबरच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेत रोमानियन नागरिकाने बुधवारी आत्महत्या केली. तो गोवा येथून मुंबईत रोमानियन दूतावासाकडे मदत मागण्यासाठी आला होता. मात्र मदत न मिळाल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला आहे.कफपरेड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण मंगळवारी गोव्याहून ट्रॅव्हल बसने मुंबईत आला. त्याच्याकडे पैसे नव्हते. गोव्यातील नागरिकांना त्याने मुंबईत सोडण्याबाबत विनंती केली. मुंबईतील मेकर चेंबर्समध्ये रोमानियन दूतावासाचे कार्यालय आहे. ते आपल्याला मदत करतील असे त्याने प्रवाशांना सांगितले. आणि प्रवाशांनी मदत केलेल्या पैशांतून तो मुंबईत आल्याची माहिती ट्रॅव्हलवाल्यांच्या चौकशीतून समोर आली. येथे आल्यानंतर तो रात्रीही मेकर चेंबर्सकडे आला होता. मात्र २००९मध्येच येथील रोमानियन दूतावासाचे कार्यालय बंद झाल्याचे त्याला सांगण्यात आले. बुधवारी सकाळी त्याने दोनदा येथे चौकशी केली. येथील स्टॉलवर सॅण्डवीच खात पाण्याची बॉटल खरेदी केली. तेव्हा तो थरथरत असल्याचे सॅण्डवीच विक्रेत्याकडून समजल्याचे जाधव यांनी सांगितले.तरुणाकडे फक्त पाण्याची बॉटल होती. त्याच्या खिशात दोनशे रुपये होते. त्याची ओळख पटविण्यास अडचण येत आहे. रोमानियन दूतावासास मेलद्वारे घटनेची माहिती, फोटो पाठविला आहे. त्यांच्याकडून आलेल्या माहितीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
अकराव्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 5:33 AM