मनाविरुद्ध लग्न जुळवल्याने आत्महत्या
By Admin | Published: March 2, 2016 02:26 AM2016-03-02T02:26:00+5:302016-03-02T02:26:00+5:30
मनाविरुद्ध लग्न जुळवल्याने १७ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री चुनाभट्टी येथे घडली.
मुंबई : मनाविरुद्ध लग्न जुळवल्याने १७ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री चुनाभट्टी येथे घडली. आयेशा खान (१७) असे तिचे नाव असून या प्रकरणी चुनाभट्टी पोलीस अधिक तपास करत आहेत.
चुनाभट्टी परिसरात कुटुंबीयांसोबत राहत असलेली आयेशा एसएनडीटी महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वी तिच्या कुटुंबीयांनी तिचे मनाविरुद्ध लग्न जुळवले होते. परीक्षा सुरू असल्याने ती सोमवारी रात्री ११च्या सुमारास बेडरूममध्येच अभ्यास करत होती. जेवायला बाहेर आली नाही म्हणून कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडला, तेव्हा आयेशा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
घटनेची माहिती मिळताच चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीला सायन रुग्णालयात हलविले, मात्र तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनाविरुद्ध लग्न जुळवल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे.
घटनेच्या आदल्या रात्री कुवेत येथे असलेल्या आत्याच्या मुलाला तिने याबाबत सांगितले होते. त्यानेही तिला लग्नास नकार देण्याचा सल्ला दिला होता. अधिक तपास सुरू असल्याची माहिती चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील भोसले यांनी दिली. (प्रतिनिधी)