दहावीच्या विद्यार्थ्याची मुलुंडमध्ये आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 05:05 AM2017-09-15T05:05:38+5:302017-09-15T05:05:51+5:30
शाळेतून घरी आल्यानंतर एका दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. सोहम् संजय लांडगे (१४) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येमागचे गूढ कायम असून, या प्रकरणी नवघर पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबई : शाळेतून घरी आल्यानंतर एका दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. सोहम् संजय लांडगे (१४) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येमागचे गूढ कायम असून, या प्रकरणी नवघर पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुलुंड पूर्वेकडील पीएमजीपी वसाहतीत सोहम् आई-वडील आणि मोठ्या भावासोबत राहायचा. आई-वडील दोघेही नोकरी करतात. तर भाऊ आयटीमध्ये कामाला आहे. बुधवारी दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर सोहम् एकटाच होता. त्याचदरम्यान त्याने गळफास घेत आत्महत्या केली. रात्री घरी परतलेल्या आई-वडिलांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देत त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळावरून कुठल्याही स्वरूपाची सुसाईड नोट मिळालेली नाही. सोहम् सर्वांचाच लाडका होता. त्याने हे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. गुरुवारी त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी त्याच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाइकांकडे अधिक चौकशी सुरू आहे. अद्याप तरी आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधव मोरे यांनी दिली.