मुंबई - गोरेगाव पुर्वेला राहणा-या 24 वर्षीय तरुणाने उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केली. तरुणाचं नाव शमुवेल घोरपडे असून आत्महत्या करण्यापुर्वी त्याने सुसाईड नोट लिहून व्हॉट्सअॅपवर पोस्ट केली होती. तरुणाने आपले नातेवाईक आणि मित्रांना ही सुसाईट नोट पाठवली होती. त्यानंतर त्याने उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केली.
अशोक नगरमध्ये राहणा-या शमुवेल घोरपडे याने पाठवलेला मेसेज पाहून घोरपडे कुटुंबियांची झोपच उडाली. मेसेजमध्ये लिहिलं होतं की, 'मी आत्महत्या करत आहे. मी जीव देत असून यासाठी कोणीही जबाबदार नाही'.
शमुवेल घोरपडेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मेसेज सकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास आला होता. मेसेज आल्यानंतर कुटुंबियांनी शमुवेलचा शोध घेण्यासाठी धावाधाव सुरु केली. खूप वेळ शोध घेऊनही शमुवेलचा काही पत्ता लागत नव्हता. अखेर एका रिक्षामध्ये शमुवेल मृतावस्थेत आढळला. कुटुंबियांनी यानंतर वनराई पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी शमुवेलला बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंट्रलमध्ये नेलं. तिथे डॉक्टरांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. यावेळी शमुवेलचे रिपोर्ट्स नॉर्मल आले. कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास टाकत देवाचे आभार मानले आणि शमुवेलला घेऊन घरी आले.
रविवारी रात्री अचानक शमुवेलला उलट्या सुरु झाल्या. तब्बेत जास्त बिघडल्यानंतर कुटुंबिय पुन्हा एकदा शमुवेलला स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी कुटुंबियांना सिद्दार्थ रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी तपासणी केली असता, संपुर्ण शरिरात विष पसरलं असल्याचं लक्षात आलं. डॉक्टरांनी उपचाराला सुरुवात केली मात्र शमुवेलला वाचवू शकले नाहीत. मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
वनराई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमुवेल घोरपडे याचं एका तरुणीवर प्रेम होतं. त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. आपल्या मनासारखं न झाल्याने अखेर शमुवेल घोरपडेने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शमुवेल घोरपडेचे रिपोर्ट्स नॉर्मल असल्याचं सांगितल्याने ट्रॉमा सेंटरच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.