Join us

विषारी इंजेक्शन टोचून डॉक्टरची आत्महत्या; शिवडीतील टीबी रुग्णालयातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 7:23 AM

आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. आर. ए. किडवई पोलिसांनी अकाली मृत्यूची नोंद केली. 

मुंबई : परळ येथील केईएम रुग्णालयातील औषधवैद्यक (मेडिसिन) शाखेत पहिल्या वर्षाला शिकणारे निवासी डॉक्टर आदिनाथ पाटील यांनी सोमवारी शिवडी टीबी रुग्णालयात विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली. डॉ. पाटील मूळचे जळगाव येथील आहेत. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. आर. ए. किडवई पोलिसांनी अकाली मृत्यूची नोंद केली. 

केईएममधील मेडिसिन विभागाच्या काही वॉर्डच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने तेथील रुग्णांना शिवडीतील टीबी रुग्णालयात पाठविले आहे. सोमवारी सकाळी शिवडी येथील टीबी  रुग्णालयातील डॉक्टरांच्या रूममध्ये डॉ. पाटील यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. डॉ. आदिनाथ पाटील अत्यंत हुशार विद्यार्थी होते. त्यांनी एमबीबीएसचे शिक्षणही याच रुग्णालयातून घेतले आहे. त्यांचा लहान  भाऊही एमबीबीएसची इंटर्नशिप करत आहे. त्यांचे वडीलही डॉक्टर आहेत. डिसेंबरमध्ये डॉ. पाटील यांना डिप्रेशन आल्यामुळे त्यांचे वडील त्यांच्यासोबत काही दिवस राहिले होते. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविला  आहे. 

केईएममधील डाॅक्टर - काही महिन्यांपूर्वीच केईएम रुग्णालयाच्या संलग्न वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सायकोलॉजिस्टची नियुक्ती केली होती. - ज्या विद्यार्थ्यांना काही ताण येत असेल तर त्या  सायकोलॉजिस्ट भेटू शकतात. त्यांच्यावर काही ताण-तणाव असतील तर त्यातून मार्ग काढू शकतील, असा यामागचा उद्देश होता, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी यावेळी दिली.

टॅग्स :डॉक्टरमुंबईहॉस्पिटल