Join us

डिस्चार्जच्या दिवशीच रुग्णाची आत्महत्या

By admin | Published: January 04, 2015 1:14 AM

डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णाने त्याच दिवशी सकाळी साडे आठच्या सुमारास पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना अंधेरीच्या एका खासगी रुग्णालयात घडली.

मुंबई : कर्करोगावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यावर २ जानेवारीला डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णाने त्याच दिवशी सकाळी साडे आठच्या सुमारास पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना अंधेरीच्या एका खासगी रुग्णालयात घडली. नवीन जोईसर असे त्यांचे नाव आहे़घाटकोपर येथील साई वैभव अपार्टमेंटमध्ये राहणारे जोईसर हे व्यावसायिक होते. वर्षभरापूर्वी त्यांना तोंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. यानंतर त्यांच्यावर घाटकोपरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथे एक शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांना अंधेरी पश्चिम येथील ब्रह्मकुमारीज ग्लोबल रुग्णालयात दुसरी शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. २१ डिसेंबर रोजी नवीन यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरील खोली क्रमांक ५०९मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास नवीन यांची मुलगी चहा आणण्यासाठी खोलीबाहेर गेली असताना त्यांनी खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. नवीन हे खाली पडल्याचे लक्षात आल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले, पण त्यांना तपासणीनंतर मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच डी.एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र चव्हाण, निरीक्षक बळवंत देशमुख, उपपनिरीक्षक अशोक बोराटे घटनास्थळी रवाना झाले. सुसाईड नोट मिळालेली नाही. या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून, आजाराला कंटाळून आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलीस उपपनिरीक्षक अशोक बोराटे यांनी वर्तवली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यावर कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला होता. या प्रकरणी नवीन यांची पत्नी पुष्पा यांचा जवाब नोंदवला आहे. (प्रतिनिधी)२६ मे २०१४ : शिवडी येथील टीबी रुग्णालयातील ३०वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. त्याला एमडीआर टीबीची लागण झाली होती. १ जून २०१४ : बॉम्बे रुग्णालयात दाखल असलेल्या २४वर्षीय मुलीने १२व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. तिला रक्ताचा कर्करोग होता.२ आॅक्टोबर २०१४ : शिवडी टीबी रुग्णालयातील २५वर्षीय व्यक्तीने मनगट आणि पोटाच्या नसा ब्लेडने कापून आत्महत्या केली होती. त्याला एमडीआर टीबी झाला होता.