मुंबई : गोसीखुर्द जलसिंचल घोटाळ्यातील ंआरोपी आणि डी. ठक्कर कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे मालक प्रवीण ठक्कर यांचा मुलगा जीगर ठक्करने (४१) मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आत्महत्या केली. मरिन ड्राईव्ह येथे पार्क केलेल्या गाडीतच डोक्यात गोळी झाडून त्याने स्वत:ला संपविले आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.
घाटकोपर परिसरात ठक्कर कुटुंबिय राहतात. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मरिन plaza येथ चालक सुनील सिंगला पार्क करायला सांगितली. काम असल्याने सांगून सिंगला बाहेर जाण्यास सांगितले. त्याच दरम्यान गाडीतच जीगरने डोक्यात १ गोळी झाडून आत्महत्या केली. त्याच्याकडील रिव्हॉल्वरही परवानाधारक असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली. घटनेची वर्दी लागताच मरिन ड्राईव्ह पोलीस तेथे दाखल झाले. जीगर यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात धाडला आहे. प्राथमिक तपासात आर्थिक अडचणीतून त्याने हे पाऊल उचल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.
मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालवा मातीकाम व बांधकामचे कंत्राट मुंबईतील आर. जे. शहा अॅण्ड कंपनी आणि डी ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायवेट कंपनीला दिला होता. त्यात गैरप्रकार झाल्याचा दावा करीत एसीबीने दोन्ही कंपन्यांचे संचालक कालिंदी राजेंद्र शाह, तेजस्विनी राजेंद्र शाह, त्यांच्या भागीदार कंपनीचे संचालक विशाल प्रवीण ठक्कर, प्रवीण नाथालाल ठक्कर, जिगर प्रवीण ठक्कर, अरुणकुमार गुप्ता, तत्कालीन कार्यकारी अभियंता उमाशंकर वासुदेव पर्वते व विभागीय लेखाधिकारी चंदन जिभकाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या सर्वांवर जानेवारी महिन्यात एसीबीकडून ४ हजार ४५७ पानांचे आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणाचेही त्याच्या आत्महत्येमागे काही कारण आहे का? या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.