पलूसला शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या
By admin | Published: September 22, 2014 11:10 PM2014-09-22T23:10:33+5:302014-09-23T00:11:14+5:30
द्राक्षबागेतून लहरी हवामानामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे द्राक्षबागेसाठी सोसायटीकडून काढलेल्या कर्जाचा हप्ताही ते भरू शकत नव्हते.
पलूस : येथील द्राक्षबागायतदार नामदेव रामचंद्र डाळे (वय ५०) यांनी कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. पलूस (बोरजाईनगर रोड) येथे नामदेव डाळे यांची साडेतीन एकर द्राक्षबाग आहे. मात्र द्राक्षबागेतून लहरी हवामानामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे द्राक्षबागेसाठी सोसायटीकडून काढलेल्या कर्जाचा हप्ताही ते भरू शकत नव्हते. वाढत चाललेल्या कर्जातून कौटुंबिक वादही वाढत चालले होते. सोसायटीचे ट्रॅक्टर, द्राक्षबाग उभारणी, द्राक्षपीक कर्ज, ठिबक, म्हैशी खरेदी, ऊसपीक कर्ज असे एकूण १७ लाखांचे कर्ज नामदेव डाळे यांना आहे. बँका, सोसायटीकडून वसुलीची कारवाई सुरू होती. या कर्जातून घरात पत्नीबरोबर वारंवार वाद वाढले होते. डाळे यांना तीन मुली व मुलगा आहे. मुलींच्या शिक्षणाचा, लग्नाचा खर्च आणि कर्ज यामुळे ते बेजार झाले होते.
अखेर बुधवार, दि. १७ रोजी पहाटे त्यांनी विषारी औषध प्राशन केले. पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. (वार्ताहर)