लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पायधुनी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र भगतसिंग वाणी (५६) यांनी गळफास लावून घेत आयुष्य संपविल्याची घटना कुर्ला परिसरात घडली. पत्नीच्या निधनामुळे नैराश्यात असतानाच त्यांना क्षयरोग झाला हाेता. अखेर आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
कुर्ला येथील संभाजी चौक परिसरात वाणी हे मुलगा आणि मुलीसोबत राहत होते. त्यांना दोन मुली असून, एकीचे लग्न झाले आहे. २०१९मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. पत्नीच्या निधनानंतर ते नैराश्यात होते. दरम्यान, ५ फेब्रुवारीपासून आजारी असल्यामुळे ते रजेवर होते. त्यांच्यावर उपचारही सुरू हाेते. आजारपणामुळे ते कंटाळले होते. आत्महत्येच्या एक दिवस आधी त्यांनी घराशेजारी एक रूम घेतली. सोमवाऱी मुलीला कॉल करून रुग्णालयात उपचारासाठी जाऊन आल्यानंतर कुर्ला येथील नवीन घरी जाणार असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी कुर्ला पश्चिमेकडील मधुकर शेठ चाळीतील घर गाठले. याच घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत त्यांनी आयुष्य संपवले.
दरम्यान, वडील कॉल उचलत नसल्याने मुलाने नवीन घराकडे धाव घेतली. मात्र, बराच वेळ झाला तरी दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा वाणी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना तत्काळ जवळच्या हबीब रुग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाणी यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशांक शेळके यांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळाहून कुठलीही सुसाईड नोट मिळाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
.......................