एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या, गरिबीला कंटाळून उचलले पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 05:11 AM2018-06-23T05:11:27+5:302018-06-23T05:11:40+5:30
पैशांअभावी कर्करोगाने तीन महिन्यांपूर्वी मुलीचे निधन झाले. तुटपुंज्या पगारातून मुलाचा शाळेचा खर्च, घरखर्च भागविणे कठीण होते.
मुंबई : पैशांअभावी कर्करोगाने तीन महिन्यांपूर्वी मुलीचे निधन झाले. तुटपुंज्या पगारातून मुलाचा शाळेचा खर्च, घरखर्च भागविणे कठीण होते. याच गरिबीच्या रोजच्या जीवनाला कंटाळून कफपरेडमधील एका कुटुंबातल्या तिघांनी आत्महत्या केली. आत्महत्येच्या दोन दिवसांनंतर शुक्रवारी त्यांच्या राहत्या घरातून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यांच्याकडून सुसाइड नोटही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी कफपरेड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.
कफपरेड येथील मच्छीमारनगर परिसरात प्रवीण पटेल (४०) हे पत्नी रीना (३५) आणि मुलगा प्रभू (११) यांच्यासोबत गेल्या चार वर्षांपासून राहत होते. प्रवीण हे इलेक्ट्रिशियनचे काम करायचे. दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. शुक्रवारी घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजारच्यांनी पोलिसांना दिली. घटनेची वर्दी मिळताच, कफपरेड पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा तिघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात गरिबीमुळे आलेल्या नैराश्येतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत असल्याचे पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी सांगितले. तिघांचे मृतदेह शवविच्छेदानासाठी रुग्णालयात धाडण्यात आले आहेत. या प्रकरणी कफपरेड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.
>मिळाली सुसाइड नोट
घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाइड नोट लिहिलेली एक डायरी ताब्यात घेतली. यामध्ये त्यांनी कर्करोगामुळे आजारी मुलीच्या उपचारासाठी पुरेसा पैसा नसल्याने तिचा मृत्यू झाला, याबाबत खंत व्यक्त केली, तर दुसरीकडे गरिबीमुळे आयुष्य कठीण झाल्याचे सांगितले. यामध्ये त्यांनी ६० हून अधिक जणांची नावे लिहून त्यांच्या वागण्यावर टीका केल्या आहेत. शिवाय ज्यांच्याकडून कर्ज घेतले, त्यांच्याही नावांचा यामध्ये उल्लेख केला आहे.