मुलुंडमधील घटना; मनोविकृतीतून कृत्य
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वडील आणि आजोबांची निर्घृणपणे हत्या करून २० वर्षांच्या तरुणाने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी मुलुंडमध्ये घडली. मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुलुंड पश्चिमेकडील एलबीएस मार्गावरील वसंत ऑस्कर सोसायटीतील सहाव्या मजल्यावर फ्लॅट नंबर ६०४ मध्ये मिलिंद मांगले (वय ५५) हे मुलगा शार्दूल (वय २०) व वडील सुरेश केशव मांगले (८५) यांच्यासमवेत राहत होते. पोलिसांनी सांगितले की, पत्नी वारल्याने त्यांनी घरातील कामासाठी केअर टेकर ठेवला होता. शार्दुल बीकॉमच्या अखेरच्या वर्षात शिकत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्याचे वडील व आजोबांसाेबत सतत भांडण होत होते. शुक्रवारी रात्रीही त्यांच्यात वाद झाला होता.
त्यानंतर शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास स्वयंपाकघरातील चाकूने त्याने वडील मिलिंद यांच्या पोटावर व छातीत वार केले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे केअरटेकर स्वयंपाक घरातून पळत बाहेर आला. ताेपर्यंत मिलिंद हे रक्ताच्या थारोळ्यात पडले हाेते, तर शार्दुल प्रचंड रागात हाेता. त्यामुळे केअरटेकरने सुरेश मांगले यांना तेथून उठून आतील खोलीत जाऊन दार बंद करून घेण्यास सांगितले व ताे स्वतः बाथरूममध्ये जाऊन लपून बसला. मात्र शार्दूलने आजोबांना तेथेच गाठत त्यांच्यावरही चाकूने वार केले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्याने गॅलरीत जाऊन खाली उडी मारली. डोक्याला मोठी दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत झाला.
घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांना परिसरातील अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाले होता. सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील व अन्य अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी केली. त्यांच्या नातेवाइकांना कळविण्यात आले आहे. मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व शक्यता गृहीत धरून तपास करण्यात येत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
.................